अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात दिवसेंदिवस भूजल पातळी घटत चालली आहे. महाड, पोलादपूर, सुधागड या सारख्या डोंगराळ आणि चांगले पर्जन्यमान असलेल्या तालुक्यांमध्ये देखील भूजलपातळी घटत आहे. गेल्या पाच वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण 0.49 मीटर एवढे आहे. पाणी समस्येचा अचूक अंदाज यावा म्हणून भुजल सर्वेक्षण विभागाकडून सर्वेक्षण केले जाते. यात गेल्या पाच वर्षातील भुगर्भातील पाणी साठ्याचा अभ्यास केला जातो. यावर्षी भूजल सर्वेक्षणासाठी रायगड जिल्ह्यात 50 विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या होत्या . या सर्वेक्षणात या वर्षी भुजल पातळीत मोठी घट झाल्याचे आढळून आले- गेल्या पाच वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण 0.49 मीटर एवढे आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात सरासरीच्या शंभर टक्के पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे यंदा उन्हाळ्यात पाणी समस्या जाणवणार नाही असा कयास बांधला जात होता. मात्र डिसेंबर महिन्यापासूनच भुगर्भातील पाणी पातळी घटण्यास सुरवात झाली. गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा अलिबाग 0.70 मीटर, उरण 0.87, पनवेल 0.68, कर्जत 0.12. खालापूर 0.48,पेण 0.55, सुधागड 0.61, रोहा 0.14, माणगाव 0.34, महाड 0.51, पोलादपूर 0.66, म्हसळा 0.58, श्रीवर्धन 0.38, मुरुड 0.47, तळा 0.40 मीटर पाणी पातळीत घट झाली आहे.
पाण्याचा अनिर्बंध उपसा हे भूजल पातळी घटण्यामागचे प्रमुख कारण आहे. पाणी उपसा होतो परंतु स्त्रोतांचे पुनर्भरण होत नाही. जिल्ह्यात भरपूर पाऊस पडतो. हे पावसाचे पाणी नदी , अनाल्यातून समुद्राला जावून मिळते . हे पाणी अडवून ते जमिनीत जिरवले पाहिजे. विहीरी आणि विंधण विहीरींचे पुर्नभरण या सारखे उपक्रम राबविणे गरजेचे आहे, असे भूजल शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.