नवी मुंबई ः प्रतिनिधी
नवी मुंबई पालिकेने स्वच्छ अभियान 2022 अंतर्गत पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्यासह सर्वांनी कंबर कसली असून सगळीकडे विविध प्रकारची कामे सुरू केली आहेत, मात्र रबाळे रेल्वेस्टेशन बाहेरील उद्यानातील हिरवळ सुकली आहे. त्यामुळे उद्यानात रखरखाट जाणवत आहे. घणसोली उद्यान विभागाचे याकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
रबाळे रेल्वेस्टेशन हे महत्त्वाचे रेल्वेस्टेशन असून ठाणे-बेलापूर मार्गावर आहे. आता कडक उन्हाळा सुरु झाला असून रेल्वेने प्रवास करणारा प्रवासी येथे असणार्या हिरवळीवर क्षणभर विश्रांती घेत असत, मात्र पालिकेच्या उद्यान विभागाने दुर्लक्ष झाल्यामुळे नियमित देखभाजीअभावी हिरवळ सुकून गेली आहे. त्यामुळे नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. पालिकेच्या उद्यान विभागाने या ठिकाणी सुशोभिकरण करावे, अशी मागणी होत आहे.