माणगाव ः प्रतिनिधी
मातीपासून बनविल्या जाणार्या वस्तूंना हिवाळ्याच्या दिवसात चांगली मागणी असून मातीच्या चुली व मडक्यांची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे.
ग्रामीण भागात लग्नसराई, इतर कार्यात जेवण बनविण्यासाठी मातीपासून बनवलेल्या चुली आजही वापरण्यात येतात, तसेच उन्हाळी दिवसात पिण्याच्या पाण्याचा थंडावा मिळण्यासाठी मातीची मडकी घरोघरी वापरण्यात येतात. हिवाळ्यात होणार्या पोपटी पार्टीसाठी मातीची मडकी आवश्यक असतात. पोपटीला अलिकडे व्यावसायिक स्वरूप प्राप्त असल्याने मडक्यांना मागणी वाढली आहे. त्याचप्रमाणे उन्हाळा वाढत असल्याने गारेगार पाण्यासाठी मडक्यांना
मागणी आहे. मडकी 250 ते 300 तर चुली 350 रुपयांना विकल्या जात आहेत. चुली, मडकी बनविण्याचे काम हे खूप मेहनतीचे आहे. नदीकाठच्या शेतातून माती आणणे, ती बारीक करणे, भिजविणे, चाळणीने चाळून घेणे, सुकविणे अशी प्रक्रिया करावी लागते. चांगली माती तयार झाल्यावर चुली, मडकी तयार केली जातात. त्या चांगल्या उन्हात वाळवून त्यांना भट्टीमध्ये भाजले जाते. नैसर्गिक रंगाच्या भाजलेल्या या वस्तू आकर्षक दिसतात. आधुनिक काळात परंपरागत व्यवसाय जपून ठेवणार्या या कारागिरांचे करावे तेवढे कौतुक कमीच असून मागणी कमी झाली असतानाही केवळ परंपरागत व्यवसाय व हातची कला जोपासली जावी या उद्देशाने हे कलाकार हाताने बनविण्याचे काम करत असतात.
हिवाळा सुरू झाल्यानंतर मडक्यांना चांगली मागणी येते. पोपटीसाठी व लग्नघरातील नवीन चुलींसाठी मागणी आहे. मडकी 250 ते 300 रुपये तर चुली 300 ते 350 रुपयांना विकली जातात.
– रतिया मानके, कारागीर, विक्रेता