उरण : बातमीदार
एतिहासिक चिरनेर जंगल सत्याग्रहावर आधारीत ‘चिरनेर’ हा चित्रपट महाराष्ट्रातील चित्रपटगृहात प्रसिद्ध झाला आहे. त्या चित्रपटात मामलेदाराच्या भूमिकेद्वारे उरण तालुक्यातील चिरनेर गावचा सुपुत्र सुभाष कडूंनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आहे. सुभाष कडू हे उत्तम क्रीडा प्रशिक्षक, उत्तम संघटक, सामाजिक कार्यकर्ते, उत्तम फोटोग्राफर, लेखक आहेत, तसेच उरणमधील चिरनेर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी करणार्या छावा प्रतिष्ठानचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांनी लिहिलेली एड्स, सापळा, पोपट झालारे एकांकिका विविध स्पर्धात गाजल्या आहेत, तर आगरी पेठा या विनोदी नाटकाच्या आठ प्रयोगांत त्यांनी काम केले आहे. चिरनेर चित्रपटाद्वारे सिनेमाक्षेत्रात अभिनयाद्वारे पदार्पण करतानाच त्या चित्रपटाच्या सेटवर लोकेशन मॅनेजर म्हणूनही सुभाष कडू यांनी उत्तमपणे यशस्वीरीत्या जबाबदारी सांभाळली आहे. या चित्रपटात संजय मोने, प्रदीप पटवर्धन, संजय शेजवळ सारखे तगडे कलाकार आहेत, तर आर्चना गोमे ह्या लेखिका, दिग्दर्शक व निर्मात्या आहेत. चित्रपटातील गाणे सुरेश वाडकर यांनी गायले आहे. सुभाष कडूंनी चिरनेर या चित्रपटात उत्तम अभिनय केला असून सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.