Thursday , March 23 2023
Breaking News

पनवेलमध्ये पार्थ पवार यांची स्टंटबाजी

पनवेल ः प्रतिनिधी

लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून राजकीय पक्षांत झी मराठी वाहिनीवरील ’रात्रीस खेळ चाले’च्या धर्तीवर ’निवडणुकीत खेळ चाले हा’ सुरू झाले असून, राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार हे सभेसाठी धावत पळत जातानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  शरद पवारांचे नातू तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेचे मावळमधील उमेदवार पार्थ पवार बुधवारी रात्री पनवेलमधील मोहल्ला परिसरात धावत जात असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात फिरत आहे. पनवेलमध्ये सभेला येण्यासाठी उशीर झाल्याने पार्थ पवार धावत सभेच्या ठिकाणी जात आहेत, अशा आशयाचा मेसेज व्हिडीओसोबत पार्थ पवार यांच्या पीआर टीमकडून वायरल करण्यात येत आहे. पार्थ पवार पनवेलमध्ये प्रचारासाठी येणार होते. या वेळी ते मुस्लीम मोहल्ल्यातील नागरिकांची भेट घेणार होते. पार्थ पवार धावतानाचा व्हिडीओ पनवेलमध्ये वार्‍यासारखा पसरला. त्यामुळे आता पुन्हा एकदा पार्थ पवार सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसत आहेत. सभेसाठी उशीर झाला म्हणून पार्थ पवार पळत सभेच्या ठिकाणी जात आहेत, मात्र मोहल्ला परिसरात पार्थ पवार यांची कुठलीही सभा नसल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर वाहतूक कोंडी झाली नसल्याचेही समोर येत आहे. त्यामुळे हा निवडणूकपूर्व स्टंट आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.या स्टंटबाजीमुळे सोशल मीडियावर पार्थ यांना पुन्हा एकदा ट्रोल करण्यात येत असून, निवडणुकीपर्यंत असे अनेक स्टंट पाहायला मिळतील, अशी टीका सोशल मीडियावर होताना दिसत आहे. दरम्यान, रेल्वे प्रवाशांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बुधवारी सकाळी पार्थ पवार यांनी सीएसएमटी ते पनवेल असा लोकलने प्रवास केला होता. चाकरमानी सकाळच्या वेळेस पनवेलवरून सीएसएमटीकडे मोठ्या प्रमाणात जात असतात. डबा गर्दीने भरलेला असतो, मात्र पार्थ यांनी सकाळच्या वेळेस लोकलमधून उलटा रेल्वे प्रवास करून प्रवाशांच्या कोणत्या समस्या जाणून घेतल्या यावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Check Also

सराईत सोनसाखळी चोरांना अटक

जवळपास पावणेपाच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत पनवेल : वार्ताहर खारघर, उलवेसह नवी मुंबई परिसरात …

Leave a Reply