Breaking News

शपथविधीसाठी जगनमोहन रेड्डींचे मोदींना आमंत्रण

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

आंध्र प्रदेशात प्रचंड बहुमत मिळवत सत्तास्थापनेच्या मार्गावर असलेल्या वायएसआर काँग्रेसप्रमुख जगनमोहन रेड्डी यांनी रविवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत रेड्डी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देत आपल्या शपथविधी सोहळ्यास येण्याचे आमंत्रणही दिले. जगनमोहन 30 मे रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

जगनमोहन यांचे दिल्ली विमानतळावर आगमन झाले असता विमानतळाबाहेरच त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. अखेर त्यांना सुरक्षारक्षकांनी कसेबसे बाहेर काढले. जगनमोहन यांच्या पक्षाला विधानसभेच्या 175 जागांपैकी 151 जागांवर विजय मिळाला आहे, तर या निवडणुकीत चंद्राबाबू नायडू यांचा पक्ष टीडीपीला केवळ 23 जागांवर यश मिळाल्याने राज्यात सत्ता परिवर्तन झाले. विधानसभेबरोबरच नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतही वायएसआर काँग्रेसची उत्तम कामगिरी राहिली. लोकसभेच्या 25 जागांपैकी तब्बल 22 जागांवर त्यांना विजय मिळाला आहे, तर महाआघाडीसाठी धावपळ करणार्‍या चंद्राबाबूंच्या टीडीपीला अत्यंत कमी जागांवर समाधान मानावे लागले आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply