इफ्तार पार्टीला न बोलावल्याचा राग
बुलंदशहर ः वृत्तसंस्था
रोजा इफ्तार पार्टीचे निमंत्रण न दिल्याच्या रागातून विशीतल्या तीन तरुणांनी तीन लहान बालकांचा खून केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर येथे घडली. अपहरण करून बालकांचा गोळी घालून निर्घूण खून करण्यात आला. त्यानंतर या तीन बालकांचा मृतदेह पाण्याच्या हौदात टाकण्यात आला होता. या प्रकरणात हलगर्जी दाखवल्याने प्रशासनाने दोन पोलिसांचे निलंबन केले आहे. यातील एका आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले, तर अन्य दोन आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. या हत्याकांडाने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
शुक्रवारी उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर येथे पीडित कुटुंबाने इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. पार्टीनंतर घरातील लहान मुले खेळण्यासाठी बाहेर गेली. रात्री साडेनऊच्या सुमारास हाफिज यांची आठ वर्षीय मुलगी अलीबा, आलम यांची सात वर्षीय मुलगी आसमा आणि हसीन यांचा आठ वर्षीय मुलगा अब्दुल हे अचानक बेपत्ता झाले. कुटुंबीयांनी शोधाशोध केली, पण काहीही उपयोग झाला नाही. अखेर त्यांनी पोलीस स्थानकात लेखी तक्रार दाखल केली, पण ड्युटीवरील पोलिसांनी प्रकरण गांभीर्याने न घेता वरिष्ठांनाही कोणतीच माहिती दिली नाही. शनिवारी सकाळी तिघांचे मृतदेह घरापासून सात किमी अंतरावर धतूरी गावाच्या एका हौदात आढळून आले. तिघांवरही गोळीबार करण्यात आल्याचे समोर आले. या घटनेमुळे खळबळ उडाल्यानंतर तातडीने घटनास्थळी हजर झालेल्या पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले.
पीडित कुटुंबाच्या घरी शुक्रवारी रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी मामेभाऊ मलिकला निमंत्रण देण्यात आले नव्हते. यामुळे रागावलेल्या मलिकने आपल्या दोन मित्रांच्या साहाय्याने तिन्ही बालकांचे अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या केली. या प्रकरणी मलिकला अटक करण्यात यश आले असून, अन्य दोन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.