उरण : वार्ताहर – चालत्या दुचाकीवर उच्च दाबाची वीज वाहिनी पडून एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि. 19) उरण तालुक्यात फुंडे गावाजवळ डोंगरी रोड कॉर्नरजवळ घडली. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नसली, तरी दुचाकीस्वार मात्र जखमी झाला आहे.
उरण तालुक्यातील केगाव ग्रामपंचायत हद्दीतील दांडा गावातील तरुण दिनेश जीवन पाटील (वय 35) हा दुचाकीस्वार सकाळी कामासाठी जेएनपीटीकडे निघाला होता, मात्र फुंडे गावाजवळ, डोंगरी रोड कॉर्नरजवळ आल्यानंतर अचानक रस्त्यावरून गेलेली उच्च दाबाची वीज तार त्याच्या अंगावर पडली. मोठा आवाज होऊन त्याच्यासमोर वीज पडल्याचा भास झाला. काय झाले ते कळण्याच्या आत हा मोटरसायकलस्वार जमिनीवर पडला आणि तोपर्यंत ही वीजवाहिनी त्याच्या मोटरसायकलला गुंडाळली गेली. सुदैवाने वीजपुरवठा बंद झाल्याने या तरुणाचे प्राण वाचले. महावितरणने वीजवाहिनीचा जमिनीशी संपर्क आल्यास वीजपुरवठा बंद होण्याची यंत्रणा बसवली असल्याने त्या तरुणाचे प्राण वाचले.
या घटनेची माहिती फुंडे ग्रामस्त यांनी वीज मंडळास केली असता वीज मंडळाचे कंत्राटी कामगार घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी सदर विजेच्या तारांसंबंधी तपासणी केली. या घटनेने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून उरणमध्ये रोज तार तुटण्याच्या, विजेचे खांब पडण्याच्या घटना घडत आहेत. अत्यंत जुन्या झालेल्या तारा आणि खांब यामुळे अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. वीज मंडळ व संबंधित अधिकार्यांनी उरण तालुक्यातील विजेचे जीर्ण झालेले खांब, वीज वाहून नेणार्या तारा तपासून त्या बदली करव्यात, अशी मागणी फुंडे येथील ग्रामस्थांनी केली आहे.