कळंबोली : प्रतिनिधी – कळंबोली वसाहतीतील सेक्टर 2 मधील उद्यानाची अक्षरशः दुरवस्था झाली असून, उद्यानात सडलेल्या कचर्याच्या दुर्गंधीने नागरिक त्रस्त आहेत. मच्छरचे वाढते प्रमाण व रोगराईच्या भीतीने नागरिकांना विरंगुळ्यासाठी व लहान मुलांना खेळण्यासाठी असलेले एकमेव पे अॅण्ड पार्क उद्यान ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे बंद पडण्याच्या अवस्थेत आहे. त्यामुळे नागरिकांत चिंतेचे वातावरण पसरले आहे.
सिडकोने शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सेक्टर 2 मध्ये असलेल्या उद्यानावर लाखो रुपयांचा निधी खर्च करून सर्व सुविधांनी नटलेले असे पे अॅण्ड पार्क उद्यान उभारले. उद्यानाची दुरवस्था होऊ नये व व्यवस्थित देखभाल होऊन कळंबोलीकरांना संध्याकाळी निसर्गाच्या सान्निध्यात विरंगुळा घेता यावा म्हणून हे उद्यान कर लावून ठेकेदारी पद्धतीने देण्यात आले. प्रत्येक व्यक्तीला दोन रुपये याप्रमाणे करमणूक कर आकारणी करून ते खुले करण्यात आले. कळंबोलीकरांसाठी हे एकमेव उद्यान असल्याने संध्याकाळच्या वेळेला या उद्यानात जत्रा फुललेली पाहावयास मिळत असे. संध्याकाळ झाली की शहरातील नाना-नानींबरोबर मोठ्यांचीही पावले आपल्या चिमुकल्यांसह थेट सेक्टर 2च्या उद्यानाकडे वळत आहेत. आयुष्याची संध्याकाळ आपल्या नातवंडांना खेळताना, बागडताना पाहताना नाना-नानीला एक वेगळा आनंद मिळत होता, मात्र आता हे सारे काही संपले आहे. उद्यानाची निगा
राखण्याची जबाबदारी असलेल्या ठेकेदाराच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे या उद्यानाची पूर्ण रयाच गेली आहे.
या उद्यान ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे काही महिन्यांच्या अंतराने उद्यानातील कारंजे उडणे बंद झाले, स्विमिंग तलाव लिकेज झाला, वीज गायब झाली, खेळणी तुटली आहेत असा प्रकारे या उद्यानाची दुरवस्था झाली आहे. उद्यानात गवत वाढले असून उद्यानातील काढण्यात आलेले गवत व गोळा करण्यात आलेला पालापाचोळा अनेक दिवस तसाच पडून राहिल्याने त्याला दुर्गंधी येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.