पनवेल : वार्ताहर
कोरोना रोगावर प्रभावी ठरणार्या व संपूर्ण भारतामध्ये तुटवडा असणार्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा गैरमार्गाने काळ्याबाजारात हजारो रुपये किमतीत विक्री करणार्या रॅकेटचा मध्यवर्ती कक्ष, गुन्हे शाखा नवी मुंबई यांच्याकडून पर्दाफाश करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोघा जणांना ताब्यात घेतले आहे. खारघर येथील लिटील वर्ल्ड मॉलच्या समोरील रोडवर एक व्यक्ती हा दोन रेमडेसिवीर इंजेक्शन 40 हजार रुपये किमतीस विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन. बी कोल्हटकर व पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून हरपदर कपूर सिंग (वय 41, धंदा ट्रान्सपोर्ट, रा. बल सोसायटी, सेक्टर 10, कळंबोली, नवी मुंबई) यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन रेमडेसिवीर इंजेक्शन, एक मारूती सीयाझ कार, एक मोबाइल फोन व रोख रक्कम असा एकूण पाच लाख 18 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस 26 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. गुन्ह्याच्या पुढील तपासामध्ये अटक व्यक्तीकडे मिळून आलेले दोन रेमडेसिवीर इंजेक्शन हे नवी मुंबईमधील एका कोविड रुग्णालयामधून देण्यात आले होते. तेथील डॉक्टर व नर्स यांनी संगनमत करून सात ते आठ रेमडेसिवीर इंजेक्शन बाहेर काळ्याबाजारामध्ये विक्री करीत असल्याचे आढळून आले. या प्रकरणी डॉ. सर्व जण कमलकांत सिंग (वय 27, रा. नेरूळ, नवी मुंबई, मूळ रा. बिहार) यास अटक करण्यात आली. या कारवाईमुळे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे.