आमदार प्रशांत ठाकूर यांचं राजकीय-सामाजिक क्षेत्रातील आगमन जरूर आपल्या वडिलांच्या उत्तुंग कामाची पुण्याई गाठीशी घेऊन झालं, परंतु त्यांचं आजचं यश तसंच एका संयत, समतोल, प्रगल्भ राजकीय व्यक्तिमत्त्वाची त्यांची प्रतिमा ही स्वबळावर, स्वकर्तबगारीवर कमावलेली आहे.
वटवृृक्षाच्या छायेत अन्य वृक्ष रुजत नाहीत असं म्हटलं जातं, परंतु नियमाला अपवाद हे असतातच. माजी खासदार, लोकनेते रामशेठ ठाकूर आणि त्यांचे थोरले सुपुत्र, आमदार प्रशांत ठाकूर यांना पाहिलं की या अपवादाचा प्रत्यय येतो. रामशेठ ठाकूर यांच्यासारखीच धडाडी, दूरदृष्टी, मुत्सद्दीपणा, कामाचा अफाट उरक आणि दांडगा जनसंपर्क लाभलेल्या आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांच्या छत्रछायेत राहतानाच राजकीय, सामाजिक वर्तुळात अल्पकाळात स्वतःचा स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण असा ठसा उमटवला आहे. राजकीय-सामाजिक क्षेत्रात त्यांचं आगमन जरूर आपल्या वडिलांच्या उत्तुंग कामाची पुण्याई गाठीशी घेऊन झालं, परंतु त्यांचं आजचं यश, एका संयत, समतोल, प्रगल्भ राजकीय व्यक्तिमत्त्वाची त्यांची प्रतिमा ही स्वबळावर, स्वकर्तबगारीवर कमावलेली आहे. अर्थातच, लोकनेते रामशेठ यांच्याकडून कौटुंबिक पातळीवर त्यांच्यावर झालेल्या संस्कारांचा यात मोठा वाटा आहेच, परंतु गेल्या काही वर्षांतील आमदार प्रशांत ठाकूर यांची राजकीय वाटचाल त्यांच्या राजकीय प्रगल्भतेची पुरेपूर साक्ष देते. अवघ्या देशाचा राजकीय पट 2014च्या ऐतिहासिक लोकसभा निवडणुकांनी बदलून टाकला. त्या पार्श्वभूमीवरच आमदार प्रशांत ठाकूर यांचं संपूर्ण पनवेल तालुक्यातील जनतेला खारघर टोल प्लाझा इथं टोलमाफी मिळावी यासाठीचं आंदोलन सुरू होतं. जनतेच्या हितासाठी पुकारलेल्या या आंदोलनाला तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून सुयोग्य प्रतिसाद न मिळाल्याने प्रशांत ठाकूर यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेस पक्षाला राम राम ठोकला. त्यांनी तेव्हा उचललेले पाऊल काळाची दिशा दर्शवणारे होते असे आता अनेकांना वाटत असेल, पण सतत पनवेलकरांच्या आणि स्थानिक जनतेच्या भल्याचा आणि कल्याणाचा ध्यास घेतलेल्या आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मनातला प्राधान्यक्रम सुस्पष्ट होता. स्थानिक जनतेच्या गरजा ध्यानात घेऊन, तसंच पनवेलचा कायापालट करण्याचे उद्दिष्ट सतत नजरेसमोर ठेवून प्रशांतजी सुरुवातीपासूनच अफाट झपाट्याने काम करीत आले आहेत. रस्तेबांधणी, पाणीपुरवठा, वीजपुरवठा, वैद्यकीय सुविधा यांसारख्या अनेकानेक प्रकारच्या गरजांची पूर्तता व्हावी म्हणून त्यांनी पनवेल परिसरात कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच झोकून देऊन काम केलं आहे. अर्थात, निव्वळ मूलभूत गरजा वा पायाभूत सुविधांपुरताच त्यांच्या कामाचा आवाका मर्यादित नाही. लोकांशी कसं जोडलं जावं याचं बाळकडू अर्थातच त्यांना आपल्या पिताश्रींकडून मिळालं असणार. त्यासोबतच त्यांच्या स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाची छापही त्यांच्या व्यापक कामांमध्ये दिसते. त्यामुळेच पनवेलच्या निव्वळ भौतिक विकासाच्या मागे न धावता, या शहराचे-परिसराचे व्यक्तिमत्त्व चहुअंगांनी फुलवण्याचा ध्यास त्यांच्या कार्यशैलीत दिसतो. यात सर्वात ठळकपणे जाणवते ते त्यांचे क्रीडाप्रेम. खारघर मॅरेथॉनचे दिमाखदार आयोजन असो वा अन्य क्रीडाविषयक उपक्रम प्रशांतजींचे क्रीडाप्रेम त्यात ओतप्रोत उमटताना दिसते. मॅरेथॉनचे आयोजन तर ते 2011 पासून अखंडितपणे यशस्वीरीत्या करीत आले आहेत. क्रिकेटखेरीज हॉकी, बेसबॉल आणि बॅडमिंटन आदी अन्य खेळांनाही त्यांनी
मोठं प्रोत्साहन दिलं आहे. अशा उपक्रमांतून मतदारसंघातील तरुणांशी त्यांचं आगळं नातं जोडलं गेलं आहे. पनवेल परिसराच्या सर्वांगीण विकासाकरिता क्रीडाविषयक आणि सांस्कृतिक कार्यक्रमही तितकेच आवश्यक आहेत यावर त्यांची ठाम श्रद्धा आहे. त्यामुळेच अनेकानेक सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनालाही त्यांचं कायमच भरभक्कम पाठबळ लाभत आलं आहे. सीकेटी कॉलेजमधील मल्हार महोत्सवाचं आयोजन असो की अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पनवेल शाखेकडून आयोजित केले जाणारे उपक्रम विविध कलांचा आदर करणारं त्यांचं कलासक्त व्यक्तिमत्त्व संबंधितांना जाणवल्याशिवाय राहत नाही. रंगभूमीही तर महाराष्ट्राची अस्मिता. ती जोपासण्याचं काम त्यांच्या अध्यक्षीय मार्गदर्शनाखाली अ. भा. नाट्य परिषदेची पनवेल शाखा पार पाडत असते.
सर्वच क्षेत्राबरोबरच वैद्यकिय क्षेत्रातही ते काम करत आहेत. महिलांच्या कॅन्सरविषयक कामाबद्दल विशेष जागरूकता दर्शवित धन्वंतरी आरोग्यदूत सेवा ही समविचारी सहकार्यांना सोबत घेऊन सुरू केलेली विनामूल्य सेवा आहे. कॅन्सर पीडिताला सर्वतोपरी सहाय्य करण्याचे काम ही मंडळी करतात. इतकेच नव्हे तर आमदार प्रशांत ठाकूर या माणसाने मुंबईबाहेरील अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील कर्जुले-हरेश्वर या गावाची पाणी समस्या सोडविण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेऊन श्रमदान केले आणि आपल्याकडील यंत्रणाही पाण्याचे प्रश्न सोडविण्यासाठी विनामूल्य सहकार्य करून पाणी फाऊंडेशनला हातभार लावला.
शिक्षण क्षेत्रातील अफाट कामगिरीचा वारसा तर त्यांना वडिलांकडूनच मिळाला आहे. आजच्या घडीला ते जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे संचालक, शाहु इन्सिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. युवकांसाठीचे रोजगार मेळावे असोत, दिव्यांग व गरजूंना केलं जाणारं आवश्यक उपकरणांचं वाटप असो किंवा महिला बचत गटांच्या कामाला बळ देण्यासाठीचे प्रयास असोत, विविध वयोगटांतील-स्तरांतील लोकांसोबतच्या कामांतूनच त्यांनी पनवेल परिसरात अफाट लोकप्रियता कमावली आहे. या लोकप्रियतेमुळेच भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर लगेचच भाजपचं रायगड जिल्हा अध्यक्षपद त्यांना देण्याचा निर्णय पक्षाकडून घेण्यात आला. तो सुयोग्यच असल्याचं त्यांनी अल्पकाळात पक्षसंघटना बांधणीसाठी जिल्ह्यात केलेल्या अथक प्रयत्नांतून सिद्ध झालं. राज्यातील आजच्या घडीच्या तरुण राजकीय नेत्यांमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांची कर्तबगारी व प्रगल्भता निश्चितच उठून दिसते. त्यामुळेच सिडकोसारख्या संस्थेचं अध्यक्षपदही त्यांच्याकडे चालून आलं आहे. एकीकडे अनेक दीर्घ कारकीर्द असलेल्या राजकीय नेत्यांचं अस्तित्वही आज स्वबळावरील कामगिरीऐवजी पूर्णतः पक्षाच्या व पक्षातील मान्यवर नेत्यांच्या प्रतिमेवर अवलंबून असलेलं दिसत असताना, आमदार प्रशांत ठाकूर हे निश्चितपणे स्वकर्तृत्वावर आपल्या मतदारसंघातील जनतेच्या हृदयात स्थान कमावून आहेत. माणसाने माणसासाठी प्रामाणिकपणे काम करत राहणे याच धरतीवर आमदार प्रशांत ठाकूर काम करत आहे. लोकांच्या मनात त्यांचे स्थान कायम आहे. त्यांचं हे स्थान असंच अढळ राहो व त्यांना राजकीय-सामाजिक पटावर असंच उत्तुंग यश मिळत राहो, अशा त्यांना
त्यांच्या आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा!
-देवदास मटाले, मुख्य संपादक, रामप्रहर