Breaking News

नवी मुंबईत ड्रग्स विक्रीचे रॅकेट

कोट्यवधींची उलाढाल, पोलिसांसमोर मोठे आव्हान

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

21 व्या शतकातली स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणार्‍या नवी मुंबईतले ड्रग्स विक्रीचे रॅकेट मोडीत काढण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. गांजा वगळता इतर इतर सर्व सिन्थेटिक (कृत्रिम) ड्रग्स असून, देश-विदेशात बनवले जात आहेत. हे ड्रग्स थेट मनोविकृतीवर गंभीर परिणामकारक आहेत. त्याची नशा करून अनेक गुन्हेगार गुन्हे करत आहेत.

स्मार्ट सिटीत आंतरराष्ट्रीय ड्रग्स माफियांचे जाळे पसरत असून, त्यांच्याकडून तरुणाईला जाळ्यात ओढले जात आहे. मागील तीन वर्षांत पोलिसांनी अमली पदार्थांशी संबंधित 289 कारवाया करून पाच कोटी 50 लाखांहून अधिक किमतीचे ड्रग्स जप्त केले आहे. त्यात सिन्थेटिक ड्रग्सचा (कृत्रिम) सर्वाधिक समावेश असून त्याच्या सेवनाने तरुणाई कायमची मनोविकृत होत आहे.

या ड्रग्सची नवी मुंबईत थेट विक्री वाढल्याने, नशा करणार्‍याचेही प्रमाण वाढले आहे. पानटपरीवर, झोपड्यांमध्ये तसेच आहारी गेलेल्यांकडून त्याची विक्री होत आहे. आंतरराष्ट्रीय ड्रग्स माफियांशी जोडल्या गेलेल्यांकडून त्यांना याचा पुरवठा होत आहे. त्यात नायझेरियन व्यक्तींचा सर्वाधिक समावेश असल्याचे आजवरच्या कारवाईमधून दिसले आहे.

जून 2019 मध्ये कोपरखैरणेत आफ्रिकन महिलेकडून 85 लाखांची एमडी पावडर जप्त केली होती. पाकिस्तानमधून आफ्रिकामार्गे ही महिला नवी मुंबईत ड्रग्स घेऊन आली होती. त्याशिवाय वाशीतील अनेक महाविद्यालयांबाहेर ड्रग्सची विक्री करताना नायझेरियन व्यक्तींना अटक झालेली आहे. मागील तीन वर्षांत नवी मुंबईत 289 कारवायांमध्ये तब्बल पाच कोटी 50 लाखांहून अधिक किमतीचे ड्रग्स जप्त करण्यात आले आहेत. त्यात सिन्थेटिक ड्रग्सचे प्रमाण सर्वाधिक आहे.

नवी मुंबईला ड्रग्स मुक्त करण्यासाठी 2014 साली तत्कालीन पोलीस आयुक्त के. एल. प्रसाद यांनी उपायुक्तांमार्फत मोहीम राबवली होती. त्यानंतर कारवाया थंडावल्या असता 2018 मध्ये संजय कुमार यांनी पुन्हा कारवाईंवर भर दिला. त्यानुसार गुन्हे शाखेचे अमली पदार्थ विरोधी पथक व दोन्ही परिमंडळचे विशेष पथक यांनी 2019 मध्ये 153 कारवायांमध्ये सुमारे साडेतीन कोटीचे ड्रग्स जप्त केले होते. त्यात परिमंडळ 1 च्या कारवाया अधिक प्रभावी होत्या. परंतु लॉकडाऊननंतर पुन्हा नवी मुंबईत ड्रग्स माफिया फैलावू लागला आहे. त्यामुळे विद्यमान पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी गतमहिन्यात विशेष मोहीम राबवून 16 गुन्ह्यात 77 लाखांचे अमली पदार्थ जप्त केले. त्यानंतरही ठिकठिकाणी अमली पदार्थांची विक्री व सेवन सुरूच असल्याचे पोलिसांपुढे आव्हान निर्माण झाले आहे.

289 गुन्ह्यांत 415 जणांना अटक

तीन वर्षांत नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात अमली पदार्थाच्या 289 कारवाया झाल्या आहेत. त्यात अमली पदार्थ सोबत बाळगल्याप्रकरणी 111 गुन्हे दाखल आहेत, तर सेवन केल्याप्रकरणी 147 कारवाया झाल्या आहेत. त्यामध्ये एकूण 415 जणांना अटक झालेली आहे.

मुख्य सूत्रधार अद्याप मोकाट

शहरात ड्रग्स विकणारे व सेवन करणार्‍यांवर अनेकदा कारवाई होते. मात्र, मुख्य सूत्रधार अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. देशाच्या एखाद्या कोपर्‍यातून अथवा देशाबाहेरून वेगवेगळ्या टोळ्यांचे रॅकेट नवी मुंबईत चालत आहेत. त्यांच्याकडून करोडो रुपयांच्या ड्रग्सची विक्री होत असल्याने, आंतरराष्ट्रीय ड्रग्स माफियांचे जाळे नवी मुंबईत फैलावत आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply