ज्या ठिकाणी गुरू नानक यांची प्राणज्योत मालवली होती, त्या ठिकाणी पुढे ‘कर्तारपूर साहिब गुरुद्वारा’ उभारण्यात आला. परंतु फाळणीत तो भाग पाकिस्तानात गेल्याने शीख धर्मियांना तेथे जाऊन दर्शन घेणे सोपे राहिले नाही. अखेर 1999 मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि नवाझ शरीफ यांच्यातील भेटीदरम्यान कर्तारपूर मार्गिकेविषयी प्रथमच चर्चा झाली. दिल्ली-लाहोर बस सेवेच्या प्रस्तावासोबतच कर्तारपूर मार्गिकेचा विचार सुरू होणे स्वाभाविक होते. भारतातील लाखो शीख बांधवांना गेली 72 वर्षे ज्याच्या भेटीची ओढ लागली होती… रावीच्या भारतातील तीरावरून ज्या ‘दरबार साहिब’ किंवा ‘कर्तारपूर साहिब गुरुद्वारा’चे निव्वळ दूरवरचे दर्शनच कालपर्यंत शक्य होत होते, तो पाकिस्तानातील रावी तीरावरील कर्तारपूर साहिब गुरुद्वारा गाठण्यास शनिवारी अवघी सहा मिनिटे लागली! काही काही अंतरे माणूस कशी वाढवून ठेवतो याचे याहून मोठे उदाहरण कोणते बरे ठरेल? जे अंतर कापण्यास 72 वर्षे लागली, ते अंतर अवघ्या सहा मिनिटांचे करणारी कर्तारपूर मार्गिका अर्थात ‘कर्तारपूर कॉरिडॉर’चे अखेर शनिवारी उद्घाटन झाले. शीख धर्माचे संस्थापक गुरू नानक यांच्या 550 व्या जयंतीचे औचित्य साधून भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मार्गिकेच्या चेक पोस्टचे उद्घाटन केले तर पाकिस्तानात पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांच्याकडील बाजूला कॉरिडॉरचे औपचारिक उद्घाटन केले. एक अनोखा योगायोग म्हणजे वर्षानुवर्षे रेंगाळलेल्या अयोध्या प्रकरणीचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ज्या दिवशी आला, त्या 9 नोव्हेंबरलाच भारत-पाकिस्तान दरम्यानची ही मार्गिका कार्यान्वित झाली. कर्तार म्हणजे निर्माता. कर्तारपूर म्हणजे अर्थातच देवाचे गाव. शीख धर्मियांचे आद्य गुरू नानक यांनी 1504 साली रावी नदीच्या पश्चिम तीरावर कर्तारपूर हे गाव वसवले. त्यांच्या आयुष्याच्या अखेरीस त्यांचे वास्तव्य याच गावात होते. गुरू नानक यांच्या पश्चात हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्मातील त्यांच्या अनुयायांनी दोन स्वतंत्र समाधीस्थळे उभारली असे सांगितले जाते. पुढे रावीच्या पुरात ही दोन्ही समाधीस्थळे वाहून गेली. मात्र गुरू नानक यांच्या पुत्रांनी त्यांच्या अस्थींचा कलश वाचविला आणि रावीच्या दुसर्या तीरावर या अस्थींचे दफन केले. स्वाभाविकपणे त्या ठिकाणी नव्याने वस्ती वसली. तीच पुढे ‘डेरा बाबा नानक’ म्हणून ओळखली जाऊ लागली. लाहोरमार्गे दरबार साहिबच्या दर्शनाला जायचे म्हणजे तब्बल 125 किमीचे अंतर कापावे लागे. खेरीज सर्व सरकारी सोपस्कार पार पाडायचे म्हणजे शीख धर्मियांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागे. त्यामुळे साहजिकच कर्तारपूर मार्गिकेची गरज लक्षात घेऊन त्या दिशेने प्रयत्न होत राहिले. ही मार्गिका प्रत्यक्षात साकार होईपर्यंत तमाम शीख बांधवांना रावीच्या भारतातील तीरावर उभे राहून दुर्बिणीतून दरबार साहिबचे दर्शन घेणे भाग पडत होते. पण दरबार साहिबच्या प्रत्यक्ष भेटीची शीख बांधवांची ओढ किती तीव्र होती हे ही मार्गिका सुरू होताच दिसून आले. पहिल्याच दिवशी दरबार साहिबच्या भेटीसाठी कर्तारपूर मार्गिकेवरून सीमेपलीकडे रवाना होण्यासाठी 562 भाविकांचा जथा सकाळपासूनच उद्घाटनाच्या प्रतिक्षेत ‘डेरा बाबा नानक’कडील बाजूला उभा होता. गुरू नानक यांच्या कर्मभूमीला भेट देण्याची 72 वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली आहे.
Check Also
सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान
सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …