Breaking News

आध्यात्मिकतेद्वारे जीवन परिवर्तन

धर्म समाजातील सर्व वर्गांमध्ये आध्यात्मिक जागृती, नैतिकता आणि सांस्कृतिक मूल्ये प्रस्थापित करण्याचे साधन आहे, परंतु दुर्दैवाने आज धर्माला जोडण्याऐवजी तोडण्याचे साधन बनविण्यात आले आहे. परिणामी धर्म समाजाच्या विकासामध्ये बाधक ठरल्याचे चित्र दिसत आहे. आज आवश्यकता आहे ती एका अहिंसात्मक आध्यात्मिक क्रांतीची, जी मानवामध्ये निहित उच्च मानवी मूल्ये जागृत करू शकेल. धर्माचा अर्थ आहे ईश्वरानुभूती किंवा परमतत्त्वाची ओळख, ज्यायोगे समाजात मानवता तथा विश्वबंधुत्व स्थापन होऊ शकेल.

ईश्वराची ओळख झाल्यानंतर व्यक्तीच्या जीवनात व विचारांत परिवर्तन घडून येते. ती स्वत:ला समाजाच्या प्रत्येक व्यक्तीच्या विचारांशी सहजतेने सामंजस्य प्रस्थापित करते. एका जबाबदार समाजाकडून आध्यात्मिक स्थैर्य प्राप्त करणे हा जगाचा धर्म आणि विकासाच्या दिशेने टाकलेले पाऊल ठरणार आहे, ज्यायोगे सर्वांच्या जीवनात आध्यात्मिकता आणि भौतिकतेचे संतुलन स्थापित होऊ शकेल.

जगातील शिखर संस्था असेलेल्या संयुक्त राष्ट्र संघाने हे मान्य केले आहे की आज समाज सामाजिक, आर्थिक तसेच पर्यावरणाच्या प्रदूषणाकडे वेगाने सरकत आहे. याच्यामध्ये बदल घडविण्यासाठी मानवी जीवनाबरोबरच धरतीवर राहणार्‍या अन्य प्राण्यांचे जीवनही तितकेच महत्त्वाचे आहे ही बाब आपण विचारपूर्वक स्वीकारली पाहिजे. तेव्हाच आपण इतर प्राण्यांबरोबर आणि पर्यावरणाबरोबर सद्भावपूर्ण व्यवहार करू शकू. आपण सह-अस्तित्व स्थापन करायला हवे जे सर्वांसाठी लाभदायक ठरेल.

जगभरातील वैज्ञानिक आम्हाला जागृत करत आहेत की, आमच्याजवळ वेळ फार थोडा आहे आणि तेवढ्यातच आपल्याला परिवर्तन घडविण्याची आवश्यकता आहे. असे केल्याने आपण स्वत:ला पर्यावरणाशी सकारात्मकरीत्या जोडून सध्याच्या निर्जीव, संवेदनशून्य व केंद्रीत जीवनशैलीला अधिक सार्थक, सतत स्वस्थ तसेच जीवनदायी बनवू शकू.

यासाठी आपण हे लक्षात घ्यायला हवे की, आज जगावर जी संकटे आहेत त्यांचे समाधान केवळ आध्यात्मिकतेमध्ये साठलेले आहे. एका बाजूला आज जग विकासाच्या दिशेने जाताना दिसत असले तरी दुसर्‍या बाजूला ते विनाशाच्या दिशेने प्रवास करतानाही दिसत आहे. या परिस्थितीत ईश्वरीय ज्ञानावर आधारित आध्यात्मिकता हाच एकमेव पर्याय आहे. मानवी जीवनातील अस्थैर्य आणि हिंसा थांबविण्यासाठी मानवी मूल्यांची पुनर्स्थापना केवळ आध्यात्मिकतेद्वारेच होऊ शकेल. आम्हाला मानवी जबाबदार्‍यांच्या प्रति सजग करणारा मुख्य स्रोत आहे तो केवळ आध्यात्मिकताच.

शांतीपूर्ण विकास ही जर काळाची गरज वाटत असेल तर ईश्वरीय ज्ञानाद्वारे आध्यात्मिक जागृती करणे हेच त्याचे एकमेव साधन आहे हे निरंकारी बाबा हरदेवसिंहजी यांचे वचन आजच्या परिवेशामध्ये सार्थक ठरत आहे. ‘धर्म जोडतो, तोडत नाही’ तसेच ‘एकाला जाणा, एकाला माना, एक व्हा’ हे मिशनचे संदेश जगाला आध्यात्मिकतेकडे प्रेरित करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

संत निरंकारी मिशनची 90 वर्षे

मागील 90 वर्षांपासून संत निरंकारी मिशन आध्यात्मिकतेद्वारे परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयास करत आहे. हे मिशन एक आध्यात्मिक विचारधारा आहे आणि वर्तमान सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज यांच्या दिव्य मार्गदर्शनाखाली ‘ब्रह्माची प्राप्ती, भ्रमाची समाप्ती’ हा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहचविण्याचा प्रयास

करत आहे.

संत निरंकारी मिशनचा प्रारंभ 25 मे 1929 रोजी अविभाजित हिंदुस्थानातील पेशावर (सध्या पाकिस्तान) येथे झाला. बाबा बूटासिंहजी यांच्याकडून बाबा अवतारसिंहजी यांनी ईश्वरानुभूती प्राप्त केली आणि हा सत्याचा आवाज जना-जनापर्यंत पोहचविण्यासाठी स्वत:ला समर्पित केले तो हा दिवस होय. बाबा बूटासिंहजी आणि बाबा अवतारसिंहजी या दिव्य जोडीने जवळजवळ 14 वर्षे ब्रह्मज्ञानाचा आवाज बुलंद करण्याचे कार्य केले. सन 1943मध्ये बाबा बूटासिंहजी ब्रह्मलीन झाले; मात्र शरीर त्यागण्यापूर्वी त्यांनी बाबा अवतारसिंहजींच्या खांद्यावर मिशनची धुरा सोपवून त्यांना आपले उत्तराधिकारी म्हणून घोषित केले. अशा प्रकारे निराकार परमात्मा बाबा अवतारसिंहजी यांच्या शरीरामध्ये प्रकट झाला. 1947मध्ये देशाची फाळणी झाल्यानंतर बाबा अवतारसिंहजी दिल्लीमध्ये येऊन स्थायिक झाले आणि त्यांनी मिशनला एक सदृढ प्रबंध व्यवस्था बहाल केली. त्यांनी

1948मध्ये संत निरंकारी मंडळ नोंदणीकृत केले. हीच परंपरा पुढे चालवत दिनांक 3 डिसेंबर 1962 रोजी बाबा अवतारसिंहजी यांनी एक सामान्य प्रचारक म्हणून कार्य करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर सतत सात वर्षे एक गुरसिख म्हणून मिशनचा संदेश मानवमात्रापर्यंत पोहचवत राहिले. परिणामी बाबा अवतारसिंहजी यांनी घोषित केल्यानुसार बाबा गुरबचनसिंहजी हे सद्गुरू रूपात प्रकट झाले. याची औपचारिक घोषणा 5 नोव्हेंबर 1963 रोजी दिल्ली येथील वार्षिक संत समागमामध्ये करण्यात आली. बाबा गुरबचनसिंहजी यांनी मिशनचा आध्यात्मिक संदेश देण्याबरोबरच समाज कल्याणाच्या दिशेनेही पावले टाकली, मात्र मानवताविरोधी व कट्टरपंथी लोकांकडून मिशनचा सत्याचा आवाज थांबवण्याचा अनेक प्रकारे प्रयत्न केला. त्याचाच परिणाम म्हणून दिनांक 24 एप्रिल 1980 रोजी बाबा गुरबचनसिंहजी यांना मानवतेच्या बलिवेदीवर आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली, तथापि जाता जाता त्यांनी आपली दैवी जबाबदारी निभावत बाबा हरदेवसिंहजींना मिशनचे भावी मार्गदर्शक म्हणून घोषित केले. बाबा हरदेवसिंहजी दिनांक 24 एप्रिल रोजीच सद्गुरू रूपात प्रकट झाले होते, पण याची औपचारिक घोषणा दिनांक 27 एप्रिल 1980 रोजी करण्यात आली.

वर्ष 1980पासून बाबा हरदेवसिंहजी यांनी आपल्या दिव्य मार्गदर्शनाखाली मिशनचा आवाज देशाच्या कानाकोपर्‍यात पोहचवला. इतकेच नव्हे तर विदेशामध्येही मिशनच्या सत्य संदेशाला व्यापक रूप प्रदान केले. बाबा हरदेवसिंहजी यांच्या जवळपास 36 वर्षांच्या मार्गदर्शनाखाली मिशनच्या 3000 शाखा स्थापन झाल्या, ज्यातील जवळजवळ 200 विदेशात आहेत. शिवाय भारतासह जगभरात मिशनची 700 सत्संग भवने निर्माण झाली.

मिशनची परंपरा पुढे चालवत बाबा हरदेवसिंहजी यांनी हयात असतानाच पूज्य माता सविंदर हरदेवजी यांना मिशनचा पुढील मार्गदर्शक बनविण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर दिनांक 13 मे 2016 रोजी कॅनडा येथे एका कार अपघातात बाबाजींनी आपल्या नश्वर देहाचा त्याग केला. बाबा हरदेवसिंहजी यांनी मिशनला एक मजबूत प्रशासकीय व्यवस्था आणि आध्यात्मिक आधार प्रदान केला. वास्तविक सद्गुरू 13 मे 2016 रोजीच माता सविंदर हरदेवजी यांच्या रूपात प्रकट झाले होते, तथापि याची औपचारिक घोषणा संत संगतीमध्ये दिनांक 17 मे 2016 रोजी करण्यात आली. आपली ढासळणारी प्रकृती पाहून सद्गुरू माता सविंदर हरदेवजी यांनी हे दैवी विधान पुढे चालवत पूज्य सुदीक्षाजी यांना मिशनचे भावी मार्गदर्शक म्हणून दिनांक 16 जुलै 2018 रोजी घोषित केले. सद्गुरूने आपले रूप पालटले होते. याचा औपचारिक समारोह 17 जुलै 2018 रोजी संत संगतीमध्ये करण्यात आला. ज्या वेळी माता सविंदर हरदेवजी यांनी पूज्य सुदीक्षाजी यांच्या मस्तकावर तिलक लावला, त्यांना सद्गुरूच्या आसनावर विराजमान केले आणि सद्गुरूच्या आध्यात्मिक शक्तीचे प्रतीक असलेला श्वेत दुपट्टा त्यांच्या गळ्यात परिधान केला. वर्तमान समयाला सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज संत निरंकारी मिशनचा ‘एक धरती, एक परिवार, एक निरंकार’ हा संदेश जगाला देत असून मानव एकता स्थापन करण्यासाठी कटिबद्ध आहेत.

-गोपाल रामदेव

(लेखक संत निरंकारी मिशनचे अनुयायी आहेत.)

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply