पनवेल : रामप्रहर वृत्त
अलिकडेच भारतीय वायूदलाने पाकिस्तानातील बालाकोटमध्ये एअर स्ट्राइक करुन अतिरेक्यांचे तळ उध्वस्त केले. या एअर स्ट्राइकमध्ये मोलाची कामगिरी बजावलेल्या मिराज आणि मिग 21 या लढाऊ विमानांच्या प्रतिकृतींचे टेक ऑफ आणि लँडींग बघण्याची संधी पनवेकरांना प्रजासत्ताक दिनी मिळणार आहे. 26 जानेवारीला दुपारी साडेतीन वाजता रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल आणि रोटरी क्लब ऑफ उलवे नोड यांनी पनवेल येथील कर्नाळा स्पोर्टस् अॅकॅडमीच्या स्टेडियममध्ये एरोमॉडेलिंग शोचे आयोजन केले आहे. या शो मध्ये रेडिओ कंट्रोल विमानांची प्रात्यक्षिके, मिग, सुखोई, राफेल, मिराज यांच्या प्रतिकृतींच्या थरारक कसरती, कोलांट्या, गिरक्या, सूर, पाठलाग, हवाई पुष्पवृष्टी, उडता मासा, ग्लायडर, उडती तबकडी हे सर्व याची देही याची डोळा अनुभवण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय, हातात 40 फूट लांब पंख आणि 20-20 दोर्या धरुन पाठीला फिरणार्या पंख्याचे इंजिन बांधून जमिनीवरुन पळत जाऊन हवेत झेप घेणारा माणूस अर्थात पॅरामोटरींग हे या शोचे प्रमुख आकर्षण असणार आहे. हा शो पुणे येथील सदानंद काळे, अथर्व काळे आणि अक्षय काळे सादर करणार असून तो सर्वासाठी विनामूल्य आहे. मुलांना मोबाइल आणि कम्प्युटर गेम्सपासून परावृत्त करुन त्यांनी एरोमॉडेलिंग आणि पॅरामोटरींगसारख्या प्रगत छंदाकडे वळावे ही या एरोमॉडेलिंग शो मागच्या आयोजनामागची कल्पना असल्याचे रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या अध्यक्षा प्रिया पाटील, रोटरी क्लब ऑफ उलवे नोडचे अध्यक्ष रविंद्र पाटील आणि या एरोमॉडेलिंग शोचे संयोजक प्रकाश रानडे यांनी सांगितले. या कार्यक्रमानंतर हवेत उडणार्या तीन आकर्षक विमानांचा एक संच अवघ्या 500 रुपयात मुलांना उपलब्ध करुन दिला जाणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : प्रकाश रानडे – 98204 03159