
कर्जत : प्रतिनिधी
वाचनालयावरून त्या शहराची किंवा गावाची संस्कृती समजते, म्हणूनच वाचनालय हे त्या शहराचा चेहरा असतो. मराठी भाषेतील शब्दांचे अर्थ विविध आहेत. ते गुगल सर्च करून कळणार नाहीत तर त्यासाठी शब्दकोश वापरले पाहिजेत असे प्रतिपादन प्रा. संध्या शहापुरे यांनी येथे केले. कर्जतमधील लक्ष्मीकांत सार्वजनिक वाचनालयाचे शतक महोत्सवी वर्ष सुरू आहे. त्याचे औचित्य साधून येथील पद्मा कुलकर्णी यांच्या ‘तेजस्विनी‘ व लहान मुलांकरिता ‘प्रार्थना पुस्तिका‘ तर मीना करमरकर यांच्या ‘उर्मी‘ या पुस्तकांचे प्रकाशन प्रा. संध्या शहापुरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. हल्ली वाचनाकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत प्रा. संध्या शहापुरे यांनी यावेळी व्यक्त केली. वाचनालयाचे अध्यक्ष दीपक बेहेरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. लेखिका करमरकर, कुलकर्णी यांनी आपली मनोगते व्यक्त केली. सूत्रसंचालन जोगळेकर यांनी केले. विशेष म्हणजे येथील ज्येष्ठ साहित्यिक वसंत जोशी यांचा त्यांच्या निवासस्थानी जाऊन स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. शतकमहोत्सवी समिती अध्यक्षा डॉ. विजया पेठे, कार्याध्यक्ष पद्माकर गांगल, अभिनव ज्ञान मंदिर संस्थेचे कार्याध्यक्ष गणेश वैद्य, श्रीराम पुरोहित, प्रकाशक अंशुल कुळकर्णी, आंनद दाते, राहुल वैद्य, दिलीप गडकरी, अनुुुपमा कुळकर्णी, विनायक बहुतुले, रामदास गायकवाड, सुभाषचंद्र नातू, योगिता साखरे, अनिल आंधळकर, वनिता गायकवाड आदींसह कर्जतमधील साहित्यप्रेमी नागरिक या वेळी उपस्थित होते.