रांची : वृत्तसंस्था
2019 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आल्यानंतर महेंद्रसिंह धोनीने भारतीय संघातील आपले स्थान गमावले आहे. आगामी टी-20 विश्वचषक आणि धोनीचे वाढते वय लक्षात घेता, त्याच्या संघातील पुनरागमनाच्या शक्यता कमी झाल्या आहेत. मात्र आगामी वर्षात धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळताना दिसू शकतो.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आगामी वर्षात आशियाई एकादश विरुद्ध उर्वरित जग एकादश अशा टी-20 सामन्याचे आयोजन करण्याची तयारी दाखवली आहे. 18 व 21 मार्च 2020 रोजी ढाका शहरात हे सामने होणार आहेत. या सामन्यांसाठी भारतीय संघातील सात खेळाडूंना परवानगी द्यावी, अशी मागणी बांगलादेश क्रिकेट बोर्डाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) केल्याचे समजते. या सात भारतीय खेळाडूंमध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार व महेंद्रसिंह धोनीचा समावेश असल्याचे कळते.
होय, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने विशेष सामन्यांचे आयोजन केले आहे. यासाठी आम्ही बीसीसीआय आणि इतर आशियाई क्रिकेट बोर्डाच्या अधिकार्यांशी संपर्कात आहोत. बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अधिकारी निझामुद्दीन चौधरी यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. याआधी 2007 साली धोनी हा आशिया एकादश विरुद्ध आफ्रिका एकादश या मालिकेत खेळला होता. त्यामुळे बीसीसीआय आता बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या विनंतीवर काय निर्णय घेते हे पाहणे महवाचे ठरणार आहे व त्याकडे लक्ष आहे.