केपटाऊन : वृत्तसंस्था
वेस्ट इंडिजचा दमदार सलामीवीर ख्रिस गेल याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दी बाबत अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही, पण मझन्सी सुपर लीग (एमएसएल) या ट्वेन्टी 20 लीगमधून त्याने भावनिक होत माघार घेतल्याचे वृत्त आहे.
जेव्हा मी तीन-चार सामन्यांत चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरतो, त्या वेळी ख्रिस गेल म्हणजे संघावरचे ओझे असते, असे खुद्द गेलने पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान, टी 20 क्रिकेट स्पर्धेत गेल सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे, पण ‘एमएसएल’मध्ये त्याची कामगिरी अत्यंत सुमार होती. सहा सामन्यांत गेलने केवळ 101 धावा केल्या. त्यात त्याने फक्त एक अर्धशतक लगावले. त्यानंतर गेलने भावनिक होत एमएसएलमधून माघार घेतली.
मी केवळ एका संघाबाबत बोलत नाही. विविध टी 20 लीग क्रिकेट स्पर्धेत मी अनेक वर्षे खेळलेलो आहे. त्यानंतर मी असे अनुभवले आहे की जेव्हा ख्रिस गेल धावा करत नाही, तेव्हा तो त्या संघासाठी ओझे ठरतो. याचाच अर्थ एक विशिष्ट खेळाडू संघासाठी ओझे ठरतो. गेल जेव्हा काही सामन्यात अपयशी ठरतो, तेव्हा त्याने आधी काय केले आहे हे सारे लगेच विसरतात. त्या वेळी मला थोडाही सन्मान मिळत नाही, असे तो म्हणाला. सुरुवातीला ख्रिस गेलला सन्मान मिळतो, पण ज्या क्षणाला गेल अपयशी ठरतो, तेव्हा तो माझ्या क्रिकेट कारकिर्दीचा शेवट असतो. त्या वेळी गेल हा सर्वात खराब खेळाडू ठरतो. तो सर्वात निरूपयोगी होतो. त्यामुळे मी आता या गोष्टींना सरावलो आहे, असेही गेल म्हणाला.