उरण : प्रतिनिधी
उरण तालुक्यातील धुतूम ग्रामपंचायतीमध्ये सध्या मनमानी कारभार सुरू आहे. ग्रामपंचायतीच्या सरपंच व ग्रामसेवक विरोधकांना विश्वासात न घेता हम करे सो कायदा या न्यायाने काम करीत असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षातील चार सदस्यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे. विकासकामांच्या नावाने लाखो रुपयांचा अपहार ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी केला असल्याने त्याची उच्च स्तरीयचौकशी करण्याची मागणी या चार सदस्यांनी केली आहे.
नऊ सदस्य असणार्या ग्रामपंचायतीवर सध्या शेकापची सत्ता आहे. ग्रामसेवक विनोद मोरे हे आपल्या मर्जीने ग्रामपंचायतीचा कारभार करीत असल्याचा गंभीर आरोप ग्रामविकास आघाडीचे सदस्य रविनाथ बाळाराम ठाकूर, अंगत लक्ष्मण ठाकूर, पूजा लक्ष्मण ठाकूर व निर्मला राजेश ठाकूर यांनी केला आहे.
आपल्या गलथान व भ्रष्टाचारी कारभाराने परिचित असलेले विनोद मोरे हे ग्रामसेवक विरोधी सदस्यांना ग्रामपंचायत मिटिंगचे प्रोसिडिंग न देणे, मिटिंगमध्ये पास न झालेले ठराव कामकाजात घुसविणे, न झालेल्या विकास कामांच्या नावाने ग्रामपंचायतीचा निधीचा अपहार करणे यासारखे प्रकार बिनधास्तपणे करीत असल्याचे या चार सदस्यांनी स्पष्ट केले आहे.
धुतूम ग्रामपंचायतीला वर्षाला सुमारे 90 लाखांचा कर मिळत असून या निधीचा परस्पर अपहार ग्रामसेवक व सरपंच करीत असल्याचा आरोप सदस्यांनी केला आहे. गावात अनेक विकास कामे ही फक्त कागदावर दाखवून त्या विकासकामांच्या नावाने रक्कम खर्च केल्याचे दिसून येत आहे. गावातील अनेक रस्त्यावर एकाचवेळी दोन दोन बिले मंजूर करून त्याचा पैसा ग्रामसेवक व सरपंचांनी हडप केला असल्याने ग्रामसेवक विनोद मोरे याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी या चार सदस्यांनी केली आहे.
या कारभाराची तक्रार उरण पंचायत समितीकडे तक्रार केली आहे, मात्र त्यावर अद्याप कारवाई झाली नसल्याचे या सदस्यांनी पत्रकार परिषदेत नमूद केले आहे. धुतूम ग्रामपंचायतीच्या घनकचरा प्रकल्पावर सुमारे 40 लाखांचा निधी खर्च केला असून हा घनकचरा प्रकल्प अवघ्या काही दिवसात बंद होऊन आज तो भंगारावस्थेत आहे. याची चौकशी होऊन या प्रकल्पावर खर्च झालेला पैसा ग्रामसेवक व सरपंचाकडून वसूल करावा, अशी मागणी विरोधी सदस्यांनी केली आहे.
त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीचे आर्थिक खाते राष्ट्रीयकृत बँकेत असावे ते सहकारी बँकेत असू नये असा ठराव घेऊनही सरपंच व ग्रामसेवकाने ग्रामपंचायतीचे 57 लाख रुपये कर्नाळा बँकेत ठेवले पर्यायाने कर्नाळा बँक बुडीत निघाल्याने ग्रामपंचायतीचा पैसा सुध्दा बुडीत गेल्याने सरपंच व ग्रामसेवकाने जनतेच्या या पैशाची भरपाई करावी, अशी मागणी ग्रामविकास आघाडीच्या या सदस्यांनी केली आहे. असून या मनमानी कारभारा विरोधात लवकरच वरिष्ठ पातळीवर तक्रार करणार असल्याचे या सदस्यांनी स्पष्ट केले आहे.
धुतूम ग्रामपंचायतीमध्ये कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार नसून, आमचा मनमानी कारभारही नाही. विरोधी सदस्यांना नियमित माहिती व सभेचे प्रोसिडिंग देण्यात येते. त्यांनी केलेले आरोप हे बिनबुडाचे व पूर्वग्रहदूषित असल्याने कितीही चौकशी झाली तरी, त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही.
-विनोद मोरे, ग्रामसेवक, धुतूम ग्रामपंचायत