माथेरान पालिकेची कारवाई
कर्जत : बातमीदार
माथेरानमधील जामा मशीद शेजारील खान हॉटेल मालकाने अनधिकृतपणे स्विमींग पुलाचे बांधकाम सुरु केले होते, त्यासंदर्भात येथील मुस्लीम समाजाने नगर परिषदेकडे एक महिन्यापुर्वीच लेखी तक्रार अर्ज दाखल केला होता. नगर परिषदेने धडक कारवाई करत येथे झालेले बांधकाम पाडण्यात आले.
या मशीदी शेजारी उभारण्यात येणार्या स्विमिंग पुलामध्ये चालणार्या अश्लिल चाळ्यांमुळे प्रार्थनेवेळी आमच्या धार्मिक भावना दुखवल्या जाऊ शकतात तर सदर स्विमींग पुल अनधिकृतपणे बांधला जात असल्याचा उल्लेख मुस्लिम समाज बांधवांनी नगर परिषदेला दिलेल्या तक्रार अर्जात केला होता. मात्र नगर परिषदेने एक महिनाभर त्या तक्रारी अर्जाची दखल न घेतल्याने खान हॉटेल मालकाने सदर स्विमींग पुलचे काम राजरोसपणे सुरु ठेवले होते. त्यामुळे येथील येथील मुस्लीम समाज बांधव मुजोर हॉटेल मालका विरोधात रस्त्यावर उतरल्याने नगर परिषद प्रशासनाचे धाबे दणाणले. नगर परिषद प्रशासनाने धडक कारवाई करीत अनाधिकृतपणे सुरु असलेल्या स्विमींग पुलाचे बांधकाम पाडले. या वेळी अतिक्रमण हटाव पथकाचे प्रमुख राजेश रांजाणे, रंजित कांबळे, चेतन तेलंगे, स्वागत विरंगुळे, प्रविण सुर्वे, अर्जुन पारधी यांच्यासह कर्मचार्यांनी ही कारवाई केली.
मशीदी शेजारील जागा सोडुन स्विमींग पुल अन्य ठिकाणी बांधावा, यासाठी आम्ही समाजाच्या वतीने खान हॉटेल मालकाला विनंती केली होती. परंतु त्याने त्याकडे जाणूनबुजुन दुर्लक्ष केले. त्यामुळे आम्हाला नगर परिषदेकडे तक्रार करावी लागली. त्याची दखल घेत आज नगर परिषदेने केलेल्या कारवाईमुळे आमच्या समाजाला न्याय मिळाला.
-नासिर शारवान, अध्यक्ष, मुस्लिम समाज, माथेरान
मुस्लीम समाज व नगरसेवक शकील पटेल यांच्या तक्रारीनुसार खान हॉटेल येथे सुरु असलेल्या स्विमींग पुलचे अनधिकृत बांधकाम कायदेशीर नोटीस बजावून वरिष्ठांच्या आदेशावरुन हटविण्यात आले.
-राजेश रांजाणे, अतिक्रमण हटाव पथक प्रमुख, माथेरान