16 हजार 140 शेतकर्यांना चार कोटी 56 लाखांचा निधी वितरित
अलिबाग ़: प्रतिनिधी
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांना शासनाकडून प्राप्त झालेल्या नुकसान भरपाईचे वाटप सुरु झाले आहे. रायगड जिल्ह्यासाठी पाच कोटी 17 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. यातील चार कोटी 56 लाख रुपयांच्या निधीचे वितरण पुर्ण झाले आहे. ही रक्कम शेतकर्यांच्या थेट खात्यात जमा करण्यात आली आहे. म्हणजे प्राप्त निधी पैकी 88.34 टक्के निधी वितरीत करण्यात आला आहे.
क्यार वादळामुळे रायगड जिल्ह्यातील खरीप हंगामात 26 हजार 624 हेक्टरवरील भात शेतीचे नुकसान मोठे झाले होते. तयार झालेले आणि कापणी केलेले पिक भिजल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. त्यामुळे शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात होती.
रायगड जिल्ह्यात एक लाख 15 हजार 965 हेक्टर एव्हढे खरीपाचे क्षेत्र आहे. यापैकी यंदा 95 हजार 666 हेक्टरवर भात पिकाची लागवड करण्यात आली होती. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका यातील 26 हजार 624 हेक्टर क्षेत्राला बसला. एद हजार 817 गावातील 79 हजार 016 शेतकर्यांचे भात पिक अतिवृष्टीने बाधित झाले. यात कापणी पश्चात आठ हजार 872 हेक्टरवरील तर 13 हजार 805 हेक्टरवरील इतर पिकांचा समावेश आहे.
शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 18 कोटी 10 लाख रुपयांचा प्रस्ताव शासनाला पाठविला होता.त्यातील पाच कोटी 17 लाख रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला होता. यापैकी चार कोटी 56 लाख रुपयांचा निधी 16 हजार 140 शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. उर्वरीत निधी वितरण्याची कार्यवाही सध्या सुरु आहे.
-डॉ. पद्मश्री बैनाडे, निवासी जिल्हाधिकारी, रायगड