प्रतिबंधात्मक उपाययोजनांची आवश्यकता
पेण ः प्रतिनिधी – पेण तालुक्यातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने योग्य वेळी उपाययोजनांची सुरुवात केल्याने सुरुवातीच्या काळात कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा बसला होता, मात्र लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर पेण बाजारपेठांमध्ये होऊ लागलेली गर्दी तसेच बाहेरील प्रवास करणारे नागरिक हे कोरोना संसर्गाचे माध्यम ठरत असल्याने जिल्ह्याबरोबर पेणमध्येही कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळत असून त्यापाठोपाठ उरण, पेण, माणगाव आणि अलिबाग या तालुक्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने ठोस प्रतिबंधात्मक उपाययोजना होणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे
पेण तालुक्यातील कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच चालली असून वडगाव येथील दोन महिला पॉझिटिव्ह आढळल्या असून पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 38 झाली आहे. आतापर्यंत 62 रुग्ण कोरोना आजाराने बाधित होते. त्यातील 24 रुग्ण बरे झाले आहेत. बुधवारपासून अचानक कोरोना रुग्ण वाढत जाऊन एका आठवड्यात ही संख्या 38 झाली आहे. पेण तालुक्यातील वडगाव येथील दोन महिला रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने तालुक्याची चिंता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. या रुग्णांना पनवेल व मुंबईच्या रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला परिसर प्रवेश निषिद्ध क्षेत्र जाहीर करण्यात आला असून कोणासही प्रवेशास मनाई करण्यात आली आहे.
नागोठण्यात एक, तर विभागात दोन रुग्णांची वाढ
नागोठणे ः प्रतिनिधी – शहरातील कोरोनाबाधित रुग्णाच्या 22 वर्षीय मुलासह विभागातील दोन गावांमधील एका 52 वर्षीय व्यक्तीला तसेच 42 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याची माहिती येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन म्हात्रे यांनी दिली. ही 52 वर्षीय व्यक्ती तसेच महिला येथील रिलायन्स निवासी संकुलातील रुग्णालयात नोकरी बजावत असल्याचे समजते. या सर्वांना नवी मुंबईतील रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.
रिलायन्स निवासी संकुलातील एका तरुणीसह इतर दोघे जण यापूर्वी कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने तेसुद्धा नवी मुंबईतील रुग्णालयात उपचार घेत आहेत. हा भाग पेण तालुक्यातील गडब प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येत असल्याने अधिक माहितीसाठी केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गांगुर्डे यांच्याशी संपर्क साधला असता निवासी संकुलातील रुग्णांसंख्येत वाढ झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले, मात्र याच कंपनीत काम करणार्या दोन-चार कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाल्याचे सूतोवाच त्यांनी केले, परंतु हे कर्मचारी दुसर्या तालुक्यातून बसद्वारे दररोज कामावर येत असल्याने त्याची नोंद आमच्या केंद्रात नव्हे, तर त्यांच्या तालुक्यात होईल, असे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.