Breaking News

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना सरकारचा दिलासा

नुकसानभरपाई देण्याचा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील शेतकर्‍यांना पावसामुळे झालेल्या नुकसानभरपाईपोटी आतापर्यंत 4700 कोटी रुपयांची वाढीव दराने मदत दिल्यानंतर आता ऑक्टोबरमधील पावसाने झालेल्या नुकसानीसाठीसुद्धा मदत देण्याचा निर्णय बुधवारी (दि. 2) राज्य मंत्रिमंडळाने घेतला. त्यामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळणार आहे.
ऑक्टोबरमध्ये पावसामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार सुमारे 25 लाख हेक्टर जमिनीचे नुकसान झाले आहे. आजपर्यंत कधीही सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना नुकसानभरपाई दिली जात नव्हती, पण आमच्या सरकारने प्रथमच अशा शेतकर्‍यांना वार्‍यावर न सोडता दिलासा देण्याचा निर्णय घेतला असून यासाठी सुमारे 750 कोटी रुपये इतके वाटप करण्यात आले आहे. ऑक्टोबर महिन्यात झालेला सततचा पाऊस आणि नुकसानीसाठी हेच निर्णय लागू करण्यात येणार आहेत. आम्ही महसूल आणि कृषी विभागाला निर्देश दिले होते, त्याप्रमाणे सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे वेगाने सुरू असून या संदर्भात प्रशासनाला सूचना दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्याप्रमाणे या शेतकर्‍यांचे पंचनामे लवकरात लवकर संपावावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत म्हणजे त्यांना मदत करता येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
पंचनामे वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश
मदत व पुनर्वसन विभागाने माहिती दिल्याप्रमाणे जून-जुलैपासून सुरू असलेल्या पावसामुळे नुकसान झालेल्या 40 लाख 15 हजार 847 शेतकर्‍यांना सुमारे 4700 कोटींची मदत करण्यात आली आहे. ही मदत एनडीआरएफच्या निकषापेक्षा दुपटीने जास्त व दोनऐवजी तीन हेक्टर अशी वाढीव आहे. या पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीचे पंचनामे वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. लवकरच याबाबत विहित नमुन्यात शासनास निधी मागणीचे प्रस्ताव प्राप्त होतील. शासन शेतकर्‍यांच्या प्रति संवेदनशील असून मंत्रिमंडळाने आज झालेल्या बैठकीत या शेतीपिकांच्या नुकसानीची दखल घेण्यात आली. ऑक्टोबरमधील या शेतीपिकांच्या नुकसानीकरितादेखील राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दुप्पट दराने तीन हेक्टर मर्यादेपर्यंत मदत देण्याचे शासनाकडून आश्वासित करण्यात येत आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply