मुंबई : प्रतिनिधी
हैदराबाद येथील डॉक्टर तरुणीवर झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या घटनेमुळे सर्वत्र संतापाचे वातावरण असताना देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील कुर्ला येथे एका चिमुरडीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. अवघ्या सहा वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार झाला. पोलिसांनी आरोपीवर गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे.
कुर्ला पश्चिमेकडे एका दुकानदाराने चॉकलेट देण्याच्या बहाण्याने सहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार केले. विजय महल चाळीजवळ या नराधमाचे दुकान आहे. दुकानाबाहेर खेळणार्या मुलीला चॉकलेट देतो असे सांगून त्याने आत बोलावले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. घरी गेल्यानंतर वेदना होत असल्याने मुलीने आईला सांगितले. तिला डॉक्टरकडे नेले असता, लैंगिक अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले. पीडित मुलीने दुकानदाराबाबत सांगताच तिच्या पालकांनी पोलिसांत तक्रार केली. त्यांच्या तक्रारीवरून विनोबा भावे नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि आरोपीला अटक केली. या नराधमाचे नाव कळू शकलेले नाही.