Breaking News

अपयशाचे भय नकोच!

नापास या शिक्क्याने मुलांना नैराश्य येते. त्यातील काही मुले जीवन संपवण्यासारखे टोकाचे पाऊल उचलतात हे तर खरेच. परंतु नापास हा शिक्का त्याहूनही अधिक मोठे नुकसान घडवून आणतो असे निदर्शनास आले आहे. मुख्य म्हणजे नापास मुलाला किंवा मुलीला सरसकट नालायक किंवा कुचकामी ठरवले जाते. त्याचा परिणाम पालकांवर देखील होतोच. दुर्दैवाची एक मालिकाच जणु सुरू होते. नापासाच्या या दुष्टचक्रातून बाहेर येणे दुरापास्त होऊन बसते.

मुलांच्या परीक्षा हा त्यांच्या पालकांसाठी देखील कसोटीचा काळ असतो. अभ्यास करणारी आणि न करणारी अशा दोन्ही प्रकारच्या        मुलांचे परीक्षेत काय होणार या चिंतेने पालकांना वर्षभर ग्रासून टाकलेले असते. शाळा-कॉलेजांना देखील आपला दहावी-बारावीचा निकाल शंभर टक्क्याच्या आसपास लागावा अशी प्रबळ इच्छा असते. इच्छा कसली, अट्टहासच तो! वर्तमानपत्रांमध्ये मोठमोठ्या जाहिराती देणार्‍या कोचिंग क्लासच्या तर्‍हा तर काही विचारायलाच नको. प्रचंड स्पर्धेच्या या युगात सार्‍यांचीच धडपड असते ती आपल्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त गुण मिळवून उत्तीर्ण होण्याची. या दुराग्रहाचा सर्वाधिक भार शेवटी विद्यार्थ्यांच्या कोवळ्या खांद्यावरच येतो याचे भान कोणालाच उरत नाही. उत्तीर्णतेची मोहोर आपल्या निकालपत्रावर उमटावी यासाठी विद्यार्थीवर्ग अक्षरश: भरडला जातो. नैराश्याचे झटके येऊन अनेक विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलतात. दरवर्षी दहावी किंवा बारावीच्या निकालानंतर मन विषण्ण करणार्‍या या बातम्या येतात आणि हळहळण्यापलीकडे आपल्या हाती काहीही उरत नाही. विद्यार्थी वर्गाची ही समस्या धसास लावण्यासाठी मागील फडणवीस सरकारने अत्यंत स्तुत्य पाऊल उचलले होते. तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दहावीच्या निकालपत्रावर नापास हा शेराच नसेल अशी व्यवस्था केली. त्यांनी दहावीच्या फेरपरीक्षेत विद्यार्थी तीन किंवा त्यापेक्षा अधिक विषयात अनुत्तीर्ण झाल्यास त्यास कौशल्यविकास अभ्यासक्रमासाठी पात्र हा शेरा देण्याचा निर्णय घेतला होता. त्याच धर्तीवर बारावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवरही सुधारित शेरा देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. म्हणजेच दहावीपाठोपाठ आता बारावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवरीलही नापास हा शेरा पुसण्यात येणार असून फेरपरीक्षेसाठी पात्र किंवा कौशल्यविकास अभ्यासक्रमासाठी पात्र असा शेरा मिळणार आहे. तसा शासननिर्णय शालेय शिक्षण विभागाने जारी केला असून विद्यार्थ्यांना मोठाच दिलासा दिला आहे. फडणवीस सरकारचे निर्णय उठसूठ बदलण्याचा झपाटा लावणार्‍या ठाकरे सरकारने हा निर्णय बदलण्याऐवजी आणखी पुढे नेला याबद्दल त्यांना धन्यवादच दिले पाहिजेत. गुणपत्रिकेवरील नापास हा शिक्का पुसून तेथे सुधारित शेरा लिहिल्याने परिस्थितीत काय फरक पडणार आहे असा प्रश्न कोणीही विचारेल. नापास विद्यार्थ्याला नापास नाही म्हणायचे तर काय म्हणायचे असे सामान्यजनांच्या मनात येणेही साहजिकच आहे. या दुरुस्तीने हा बदल प्रथमदर्शनी प्रतिकात्मक वाटला तरी त्याला मानसशास्त्राचे भरीव पाठबळ आहे हे लक्षात घेतले पाहिजे. अभ्यास कच्चा राहिल्याने नापास, नापास झाल्याने नैराश्य, नैराश्यामुळे पुन्हा अभ्यास कच्चा राहणे आणि पुन्हा एकदा नापासाचा शिक्का असे हे दुष्टचक्र भेदणे शक्य न झाल्याने अक्षरश: लाखो मुलांचे भवितव्य अंधारात लोटले जाते. नापास हा शब्द वजा झाल्याने हे दुष्टचक्र भेदायला विद्यार्थी व त्यांच्या पालकांना थोडेतरी बळ मिळेल हे निश्चित.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply