मुंबई : प्रतिनिधी
राज्य मंत्रिमंडळाचा मंगळवारी (दि. 9) विस्तार करण्यात आला. राजभवनातील दरबार हॉलमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी 18 नवनियुक्त कॅबिनेट मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. यामध्ये भाजप आणि शिंदे गटाच्या प्रत्येकी आठ जणांचा समावेश आहे. यापुढे होणार्या विस्तारात राज्यमंत्र्यांची घोषणा होणार आहे.
शपथविधी समारंभास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, प्रधान सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर यांच्यासह लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी, नवनियुक्त मंत्र्यांचे कुटुंबीय आदी उपस्थित होते.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भाजपचे राधाकृष्ण विखे-पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, डॉ. विजयकुमार गावित, गिरीष महाजन, रवींद्र चव्हाण, सुरेश खाडे, अतुल सावे, मंगलप्रभात लोढा आणि शिंदे गटाचे गुलाबराव पाटील, दादाजी भुसे, संजय राठोड, संदीपान भुमरे, उदय सामंत, प्रा. तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, शंभूराज देसाई यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.
भाजपकडून सर्वांत प्रथम राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. ते सहाव्यांदा मंत्री झाले. यानिमित्ताने शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अनुभवी नेत्याचा समावेश झाला आहे. याशिवाय सुधीर मुनगंटीवार यांनी यापूर्वी अर्थमंत्री, वनमंत्री अशी पदे संभाळली आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनादेखील मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. पाटील यांनी सहकार, पणन, महसूल, कृषी अशी अनेक खाती सांभाळली आहेत. विजयकुमार गावित यांनी शपथ घेतल्यानंतर राज्यपालांनी त्यांचे मराठीत अभिनंदन केले. सलग सहा वेळा आमदार राहिलेल्या गिरीश महाजन यांनाही मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. महाजन यांनी शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये जलसंपदामंत्री म्हणून काम पाहिले आहे. रवींद्र चव्हाण यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. अनेक खाती सांभाळण्याचा त्यांच्याकडे अनुभव आहे. सुरेश खाडे यांनाही मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. सामाजिक न्यायमंत्री म्हणून त्यांना मंत्रिपदाचा अनुभव आहे. अतुल सावे यांनाही मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. त्यांनी याआधी काही खाती सांभाळली आहेत. मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांना मंत्रिमंडळात पहिल्यांदा संधी मिळाली आहे. 1995पासून सलग सहा वेळा ते आमदार म्हणून निवडून आले आहेत. शिंदे गटाकडून शपथ घेतलेल्या सर्वांना याआधी मंत्रिपदाचा अनुभव आहे.
पंतप्रधान मोदींकडून मराठीतून शुभेच्छा
महाराष्ट्र मंत्रिमंडळातील मंत्र्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून शुभेच्छा दिल्या आहेत. ‘महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री म्हणून आज ज्यांनी शपथ घेतली त्या सर्वांचे अभिनंदन. प्रशासकीय अनुभव आणि सुशासनाने कारभार करण्याचा ध्यास असलेल्या व्यक्ती यांचा मिलाफ असलेली ही उत्तम टीम आहे. राज्याच्या जनतेची सेवा करण्यासाठी त्यांना माझ्याकडून शुभेच्छा,’ असे ट्वीट पंतप्रधान मोदींनी केले आहे.
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आज झाला. आजपासूनच हे मंत्री पूर्ण क्षमतेने काम सुरू करतील तसेच लवकच ते आपापल्या खात्यांचा पदभार स्वीकारतील. हे छोटे मंत्रिमंडळ असून उर्वरित विस्तार अद्याप बाकी आहे.
-एकनाथ शिंदे, मुख्यमंत्रीमंत्रिमंडळ विस्तार होत नाही असे काही लोक बोलत होते. सरकार पडेल असेही काही लोक म्हणत होते. आता विस्तार झाला आहे. सरकारही मजबूत आहे.
-देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्रीमहाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्याबद्दल सर्व नवनियुक्त मंत्रिमहोदयांचे हार्दिक अभिनंदन! आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! सर्वसामान्यांचे हे महायुती सरकार महाराष्ट्राच्या जनतेसाठी निश्चितच दमदार कामगिरी करेल असा आम्हाला विश्वास आहे.
-आमदार प्रशांत ठाकूर, अध्यक्ष,भाजप उत्तर रायगड जिल्हा