
नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे महाविद्यालये बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांची वर्गात होणारी दैनंदिन लेक्चर्स बंद आहेत. लॉकडाऊन संपल्यानंतर शैक्षणिक वर्ष संपण्यास अत्यंत कमी अवधी उरेल आणि मग घाईघाईने अभ्यासक्रम पूर्ण करावा लागल्यामुळे विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा ताण येऊ नये याकरिता पनवेलच्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयाने (बीसीटी) अभिनव संकल्पनेद्वारे विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन लेक्चर्स सुरु करुन आपले ज्ञानदानाचे काम अविरत सुरू ठेवले आहे.
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली या विधी महाविद्यालयाने एकमेकांमध्ये अंतर पाळण्याचे उद्दिष्ट साधतानाच, वर्क फ्रॉम होम ही संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शितला गावंड यांनी पुढाकार घेऊन सर्व प्राध्यापक आणि नंतर सर्व विद्यार्थ्यांची ऑनलाईन मिटींग घेऊन सुयोग्य नियोजन करुन, ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लेक्चर्स सुरू केली आहेत.
देशात कोरोना संसर्ग आजाराचा प्रसार होऊ नये याकरिता केंद्र व राज्य शासनाने 14 एप्रिलपर्यत लॉकडाऊन घोषित केले असले तरी देशामध्ये कोरोना रुग्णांची संख्या किती वाढते यावर पुढील लॉकडाऊनचे भविष्य अवलंबून आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांवर नंतर येणारा अतिरिक्त ताण टाळण्यासाठी भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालय (बीसीटी) नवीन पनवेल यांनी अभिनव संकल्पनेद्वारे आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करुन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही व आगामी काळात येणारा अभ्यासाचा ताण वाढणार नाही, याकरिता झूम या अॅपद्वारे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी ठरलेल्या वेळेला ऑनलाईन येऊन ऑनलाइन अभ्यासक्रम शिकवला जात आहे.
हे ज्ञानदानाचे कार्य अविरत चालू राहण्यासाठी प्राचार्या डॉ. शितला गावंड आणि विधी महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग वृषाली वानखेडे, श्रुती पोटे, जोबी जोसेफ, अॅड. वैभव गायकवाड, अॅड. विजयकुमार जेठीयार, अॅड. अनुजा राणे, स्वाती शर्मा, इशा एरीकेल्ला, प्रवीण पाटील, धनश्री चौगुले यांचे योगदान अत्यंत मौल्यवान आहे. यासाठी महाविद्यालयाच्या सर्वच विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद लाभला आहे. या उपक्रमाबद्दल संस्थेचे आणि महाविद्यालयाचे सर्वस्तरांतून कौतुक होत आहे.