अलिबाग : प्रतिनिधी
बर्ड मॅन ऑफ इंडिया या नावाने ओळखल्या जाणार्या पद्मविभुषण सलीम अली यांचे अभ्यास व संशोधन केंद्र अलिबाग तालुक्यातील किहीम येथे उभारण्यात येणार आहे. किहीम येथील जिल्हा परिषदेची शाळा इमारत या संशोधन केंद्रासाठी हस्तांतरीत केली जाणार आहे.
डॉ. सलीम अली हे अलिबाग तालुक्यातील धोकवडे आवास परिसरात बराच काळ वास्तव्यास होते. या काळात त्यांनी देशभरात आढळणार्या विविध पक्षांवर अनेक पुस्तके लिहिली. पक्षीनिरीक्षण आणि पर्यावरण संवर्धनातील त्यांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांना पद्मविभुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या याच कार्याची ओळख नविन पिढीला व्हावी, त्यांना पर्यावरण संवर्धन, पक्षी निरीक्षणाची आवड निर्माण व्हावी यासाठी किहीम येथे डॉ. सलीम अली अभ्यास व संशोधन केंद्र उभारणी केली जाणार आहे. पक्षी निरीक्षक आणि अभ्यासकांसाठी हे केंद्र उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
डॉ. सलीम अली यांचा जीवन प्रवास, त्यांचे उल्लेखनीय कार्य हे येणार्या पर्यटकांना आणि अभ्यासकांना अनुभवता यावे, यासाठी ग्रंथ तसेच आभासी वास्तव या अधुनिक माध्यमाचा वापर करून या अभ्यास व संशोधन केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. या संशोधन केंद्राच्या उभारणीसाठी खाजगी कंपन्यांची मदत घेतली जाणार आहे. किहीम येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत आणि त्यालगतची जागा यासाठी वनविभागाकडे हस्तांतरीत केली जाणार आहे. वनविभागा मार्फत या प्रकल्पाचा आराखडा तयार केला जाणार आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी आणि महाराष्ट्र सरकार यांच्या सयुक्त विद्यमाने हे संशोधन केंद्र उभारले जाणार आहे. या प्रकल्पासाठी लागणार्या पायाभूत सुविधा या बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी उपलब्ध करून देणार आहे. या संदर्भात मुंबईत नुकतीच एक बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात संशोधन केंद्राच्या उभारणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
डॉ. सलीम अली यांच्या अभ्यास व संशोधन केंद्रासाठी जागा हस्तांतरणाची प्रक्रीया अंतिम टप्प्यात आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी यासाठी काम करत आहे. प्रकल्पाचा आराखडा लवकरच तयार होईल यानंतर संशोधन व अभ्यास केंद्र उभारणीचे काम सुरु होईल
-आशिष ठाकरे, उपवनसंरक्षक, अलिबाग