परिसरातील नागरिकांना संसर्गाची भीती; शहरालगत कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी
कर्जत ः प्रतिनिधी
कर्जत शहरात तसेच तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. येथील कोरोना संशयितांची तपासणी शहराच्या मध्यभागी भरवस्तीत असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात करण्यात येते. हे अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे आजूबाजूला राहणार्या नागरिकांच्या जीवाला धोका उद्भवू शकतो. त्यामुळे शहरालगत मुख्य रस्त्यावर एखादी जागा ताब्यात घेऊन तेथे कोविड सेंटर सुरू करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
सर्व ठिकाणी कोरोनाच्या संसर्गाने थैमान घातले असताना कर्जत शहरात कोरोनाचा शिरकाव झाला नव्हता, परंतु कालांतराने पहिला कोरोना पॉझिटिव्ह कर्जत नगर परिषद क्षेत्रातील दहिवली परिसरात आढळला आणि दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली. कोरोनाचा संसर्ग शहरात होऊ नये म्हणून कर्जतकरांनी स्वेच्छा बंदही केला होता. त्यानंतर वेळापत्रकानुसार दुकाने उघडली. तरीही कोरोनाने शहरात शिरकाव केला. अधिक संसर्ग होऊ नये म्हणून तीन दिवस कर्जत शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. तरी कोरोना संसर्गाला रोखण्यात अपयश आले. त्या काळातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलाच. त्यापासून परिचारिका, डॉक्टरसुद्धा सुटू शकले नाहीत. आतापर्यंत तालुक्यात तब्बल 28 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यातील दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
उपजिल्हा रुग्णालयातील परिचारिका आणि दोन डॉक्टरांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर मात्र कर्जतकर भयभीत झाले. उपजिल्हा रुग्णालय कर्जत शहराच्या मध्यभागी भरवस्तीत आहे. या रुग्णालयात येण्यासाठी चारही बाजूंनी रस्ते आहेत. कोरोना संशयितांना आणताना कोणत्याही रस्त्याने आणल्यास भरवस्तीतूनच आणावे लागते. त्यामुळे त्या परिसरातील नागरिकांना संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्जत शहरालगत कमी लोकवस्तीच्या ठिकाणची एखादी जागा (उदा. मोदी रिसॉर्ट किंवा अन्य सभागृह) ताब्यात घेऊन तेथे कोविड सेंटर सुरू करावे, अशी मागणी करण्यात येत आहे. कर्जत तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता या सेंटरमध्ये 150 ते 200 रुग्णांची व्यवस्था करावी. कारण जून महिन्यात कोरोनाचा संसर्ग अधिक वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
उपजिल्हा रुग्णालयातील एका परिचारिकेला तसेच दोन डॉक्टर्सना कोरोना झाल्यामुळे तेथे अन्य डॉक्टर व कर्मचार्यांची तपासणी वेळोवेळी करणे गरजेचे आहे. रुग्णालय स्वच्छ तसेच नेहमी निर्जंतुक करणे आवश्यक आहे. येथील परिचारिकांना पाच-सहा दिवस क्वारंटाइन करावे. कोरोना संशयितांची तपासणी करताना पीपीई किट परिधान करणे सक्तीचे करावे. या रुग्णालयात अन्य रुग्णांची तपासणी बंद करावी. कर्जत शहरात शक्यतो बाहेरच्या व्यक्तींना आणि कर्जतचे स्थानिक परंतु काही कारणासाठी बाहेरगावी विशेषतः रेड झोन असलेल्या मुंबई-पुण्यात राहणार्या व्यक्तींना येऊ देऊ नये. आल्यास त्यांची वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. क्वारंटाइन व्यक्तींचे कुटुंबीयसुद्धा घराबाहेर पडले नाही तरच कोरोनावर मात करता येणे शक्य आहे, असाही एक मतप्रवाह आहे.