पनवेल : रामप्रहर वृत्त
रायगड जिल्ह्यात शुक्रवारी (दि. 29) कोरोनाच्या 52 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, चार जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात पनवेल महापालिका हद्दीत 25, कर्जत सात, पेण पाच, पनवेल ग्रामीण, माणगाव व म्हसळा प्रत्येकी तीन, अलिबाग व महाड प्रत्येकी दोन, उरण, खालापूर प्रत्येकी एक असे रुग्ण आढळून आले आहेत, तर पनवेल ग्रामीणमध्ये दोन, पनवेल मनपा हद्द व उरण तालुक्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 1008 आणि बळींची संख्या 47 झाली आहे. जिल्ह्यात दिवसागणिक रुग्ण आणि मृतांचा वाढता आकडा चिंताजनक आहे.
जिल्ह्यात कोरोना विषाणूबाधित क्षेत्र शंभरीच्या जवळ
अलिबाग : रायगड जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याचबरोबर कोरोना विषाणूबाधित क्षेत्रदेखील वाढत आहेत. जिल्ह्यात बाधित क्षेत्र 85 असून, यातील सर्वाधिक पनवेल तालुक्यात आहेत.
कोरोनाचा रुग्ण सापडणारा परिसर बाधित क्षेत्र म्हणून जाहीर केला जातो. हा परिसर सील केला जातो. सील केलेल्या परिसरात बाधित होणार्या रुग्णांची संख्या आटोक्यात आल्यानंतरच तो बाधित क्षेत्रच्या निर्बंधातून वगळण्यात येतो. कोरोनाचे रुग्ण सापडल्यामुळे रायगड जिल्ह्यात 95 परिसर बाधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले होते. त्यापैकी 10 क्षेत्र वगळण्यात आली आहेत.
जिल्ह्यात 4 मेपर्यंत केवळ 14 बाधित क्षेत्र होती. ही संख्या 95वर पोहोचली होती. त्यानंतर 10 बाधित क्षेत्रांची बंधने काढून टाकण्यात आली. त्यामुळे 85 ठिकाणी बाधित क्षेत्र कायम आहेत. रायगड जिल्ह्यात कोरोना विषाणुचा प्रसार वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी. विनाकारण घराबाहेर पडू नये. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा. त्याचप्रमाणे सोशल डिस्टन्स पाळावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …