माणगाव ः प्रतिनिधी
माणगाव नगरपंचायत हद्दीतील नाणोरे गावातील एका 62 वर्षीय पुरुषाचा कोरोना रिपोर्ट बुधवारी पॉझिटिव्ह आला असून गेल्या पाच दिवसांत माणगावात कोरोना रुग्णांची संख्या तीनवर पोहचली आहे. सद्यस्थितीत तालुक्यात एकूण आठ कोरोनाबाधित रुग्ण असल्याची माहिती माणगाव तालुक्याच्या तहसीलदार प्रियंका आयरे-कांबळे यांनी दिली आहे. माणगाव तालुक्यातील 25 गावांतून आतापर्यंत कोरोनाची लागण झालेले 58 रुग्ण आढळले असून त्यापैकी 49 रुग्ण स्वतःची इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर पूर्णपणे बरे होऊन घरी गेल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. माणगाव नगरपंचायत हद्द लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यापर्यंत पूर्णपणे कोरोनामुक्त होती, मात्र लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात माणगावात कोरोनाबाधित रुग्ण आढळण्यास सुरुवात झाल्याने ग्रामस्थांची चिंता वाढली आहे. माणगावात कोरोना हा चर्चेचा विषय झाला आहे. नाक्यावर, बाजारपेठेत कोरोनाची चर्चा होऊन सर्वांनीच याची धास्ती घेतली आहे. त्यातच अफवांनाही ऊत आला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. कोरोनाच्या संकटकाळात शासनाच्या सूचनेप्रमाणे प्रशासनाने कोरोनापासून बचाव करण्यासाठी केलेल्या आवाहनाचे पालन करावे, असे तहसीलदार प्रियंका आयरे-कांबळे यांनी सांगितले आहे.
मुरूड-अलिबाग एसटी वाहतूक सुरू
मुरूड ः प्रतिनिधी
निसर्ग चक्रीवादळामुळे मुरूड तालुक्यात रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर पडलेली झाडे दूर करण्यात आली आहेत. तसेच कोरोनाचा संसर्गही काही प्रमाणात नियंत्रणात आल्याने सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत मुरूड आगारातर्फे 15 जूनपासून मुरूड-अलिबाग एसटीची प्रवासी सेवा सुरू करण्यात आली आहे. सकाळी 6, 8.15, 10.30, 1, 15.15 आणि 18 वाजता मुरूड व अलिबाग येथून या बसेस वरील वेळेतच अलिबाग-मुरूड अशा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. जास्तीत जास्त प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन आगार व्यवस्थापक सनील वाघचौरे यांनी केले असून उत्पन्न वाढल्यास बसेसची संख्या वाढविली जाईल, असा खुलासाही त्यांनी केला आहे.
पोलीस, आरोपीस कोरोनाची लागण
कर्जत : बातमीदार
कर्जत तालुक्यात कोरोनाचे चार नवीन रुग्ण आढळले असून, यात कर्जत पोलीस ठाण्यातील शिपाई आणि नेरळ पोलीस ठाण्याच्या कोठडीत असलेल्या आरोपीचा समावेश आहे. याशिवाय पोशिर येथील कोरोना पॉझिटिव्ह मृत तरुणाची आई आणि पत्नी यांचे रिपोर्टही पॉझिटिव्ह आले आहेत.
कर्जत तालुक्यात कोरोना रुग्णांनी पन्नाशी पार केली आहे. नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमध्ये दहिवलीत राहणार्या व कर्जत पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या 35 वर्षीय पोलीस शिपायाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यासोबतच आतापर्यंत तालुक्यातील चार पोलिसांना कोरोनाने ग्रासले असून, त्यात एक अधिकारी आणि तीन कर्मचारी आहेत. दुसरीकडे खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून 14 जूनपासून नेरळ पोलीस ठाण्यात अटकेत असलेल्या 44 वर्षीय आरोपीला कोरोना झाला आहे. नेरळजवळील दहिवली ग्रामपंचायत हद्दीतील झेंडेवाडीमधील या आदिवासी व्यक्तीने दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून 40 वर्षीय पत्नीवर कुर्हाडीने घाव घातले होते. याशिवाय नेरळ-कळंब रस्त्यावर असलेल्या पोशिर गावातील कोरोनाबाधित तरुणाचा 15 जून रोजी मृत्यू झाला होता. या तरुणाच्या संपर्कात आलेल्या कुटुंबीयांची कोरोना टेस्ट 15 जून रोजी करण्यात आली होती. या टेस्टचे अहवाल प्राप्त झाले आहेत.