अलिबाग : प्रतिनिधी
चक्रीवादळात घरांचे नुकसान होते. समुद्राला उधाण येते. वीजपुरवठा खंडित होतो. अशा परिस्थितीत नागरिक सुरक्षित राहावेत म्हणून जागतिक बँकेच्या सहाय्याने राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पातून रायगड जिल्ह्यात किनारपट्टीवरील भागात निवारा केंद्र बांधणे. भूमिगत विद्युतवाहिन्या टाकणे व खारबंदिस्ती करणे ही कामे मंजूर करण्यात आली आहेत. प्रशासकीय उदासिनतेमुळे हि काम रखडली आहेत.
राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्प महाराष्ट्रातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यांमध्ये राबविण्यास मंजुरी देण्यात आली. वादळाच्या परिस्थितीत लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करता यावे यासाठी निवारा शेड बांधण्यात येतात.
या प्रकल्पांतर्गत अलिबाग आणि श्रीवर्धन तालुक्यात सुसज्ज चक्रीवादळ निवारा केंद्र बांधण्याचे निश्चित करण्यात आले होते. यात 500 ते 600 लोकांना रहाता येईल येवढा मोठा हॉल, स्वयंपाक गृह, स्वच्छता गृह यांचा समावेश होता. मात्र अलिबाग तालुक्यात याप्रकल्पासाठी जागा न मिळाल्यामुळे अलिबाग ऐवजी मुरुड आणि श्रीवर्धन तालुक्यात हा प्रकल्प राबिवण्याचे निश्चित करण्यात आले. मुरुड तालुक्यातील बोर्ली येथे तर श्रीवर्धन तालुक्यातील दिघी येथील जागा यासाठी निवडण्यात आल्या. मात्र प्रत्यक्ष कामांना सुरवात होऊ शकलेली नाही.
उधाणाचे पाणी मानवी वस्तीमध्ये शिरू नये म्हणून जिल्ह्यात45 किलोमीटर लांबीच्या खारबंदीस्तीच्या कामांना या प्रकल्पांतर्गत मंजुरी देण्यात आली आहे. जुन्या आणि जीर्ण झालेल्या खारबंदीस्तीचे सक्षमीकरण (उंची आणि रुंदी वाढवणे) या माध्यमातून केले जाणार आहे. यात अलिबाग, पेण, मुरुड तालुक्यातील सहा खारभुमी बंधार्यांचा समावेश आहे. ही कामे देखील सुरु होऊ शकलेली नाहीत. वादळातही विद्युत पुरवठा सुरळीत रहावा. विजे खांब व तारा तुटून अपघात होऊ नयेत म्हणून किनारपट्टीवरील गावांमध्ये भुमिगत विद्युत वाहिन्या टाकण्यास मंजुरी देण्यात आली. यासाठी अलिबाग शहराची निवड करण्यात आली. हे काम देखील पूर्ण होऊ
शकलेले नाही. निसर्ग चक्रीवादळात खांब पडून वीजपुरवठा खंडित झाला. लोकांना शाळांमध्ये हलवावे लागले. हा प्रकल्प पूर्ण झाला असता तर नुकसान कमी झाले असते. प्रकल्प पूर्ण होणे किती महत्वाचे आहे हे निसर्ग चक्रीवादळाने दाखवून दिले आहे.