Breaking News

वीजपुरवठा तोडल्याने मुरूड तालुक्यातील बीएसएनएलचा कारभार ठप्प

मुरूड : प्रतिनिधी

पाच लाखाचे वीज बिल गेल्या सहा महिन्यांपासून न भरल्याने बीएसएनएलच्या मुरूड कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्यातील घरगुती दूरध्वनी, भ्रमणध्वनी व इंटरनेट सेवा मागील चार दिवसांपासून बंद असल्याने ग्राहकांत संताप व्यक्त केला जात आहे. कधी काळी नामांकीत असलेली बीएसएनएल कंपनी अलीकडच्या काळात डबघाईस आली आहे. कंपनीचा टॉवर बंद पडला की त्याच्या दुरुस्तीसाठी कर्मचारी महिन्यानंतर येतात, तर इंटरनेट सेवा बंद पडल्यास सहा ते आठ दिवसाने तोडगा काढला जातो.

गेल्या सहा महिन्यांपासून वीज बिल थकल्यामुळे महावितरणने बीएसएनएलच्या मुरूड कार्यालयाचा वीजपुरवठा तोडला आहे. परिणामी बीएसएनएलची तालुक्यातील दूरध्वनी, भ्रमणध्वनी व इंटरनेट सेवा गेल्या चार दिवसांपासून बंद आहे. इंटरनेट बंद असल्याने बँकेचे व्यवहारसुद्धा ठप्प झाले आहेत. त्यामुळे ग्राहक हैराण आहेत. बीएसएनएलच्या मुरूड येथील कनिष्ठ अभियंत्यांना याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले की, बिल न भरल्याने आमच्या कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. लवकरच वरिष्ठ कार्यालयाकडून हे थकीत वीज बिल भरले जाणार आहे.

येथील बीएसएनएल कार्यालयाचे चार वीज कनेक्शन आहेत. फेब्रुवारी महिन्यापासून त्याचे बिल भरण्यात आले नव्हते. लाखो रुपयांची थकबाकी झाल्याने त्या कार्यालयाचे वीज कनेक्शन कट करण्यात आले आहे. थकीत बिलाची पूर्ण रक्कम भरल्यानंतर त्यांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात येईल.

-सचिन येरेकर, उपकार्यकारी अभियंता, महावितरण, मुरूड विभाग

Check Also

पनवेलमध्ये महायुतीकडून जोमाने प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलला विकासाच्या दिशेने नेणारे कर्तृत्वत्वान आमदार प्रशांत ठाकूर चौथ्यांदा या विधानसभा …

Leave a Reply