नवी दिल्ली : वृत्तसंस्था
नवे शैक्षणिक धोरण 21व्या शतकातील भारताला नवी दिशा देणारे ठरेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत 21व्या शतकातील शालेय शिक्षण या विषयावरील एका संमेलनात ते सहभागी झाले होते. त्या वेळी ते बोलत होते.
पंतप्रधान मोदी म्हणाले, नवे शैक्षणिक धोरण हे नव्या भारताच्या नव्या अपेक्षांना, नव्या आवश्यकतांना पूर्ण करण्याचे माध्यम आहे. याच्यामागे चार-पाच वर्षांची प्रचंड मेहनत आहे. प्रत्येक क्षेत्र आणि प्रत्येक भाषेतील लोकांनी यावर रात्रंदिवस काम केलेले आहे. अजून हे काम बाकी आहे.
काही दिवसांपूर्वी शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्यासंदर्भात देशभरातील शिक्षकांकडून आपल्या सूचना मागवल्या होत्या. एका आठवड्याच्या आतच 15 लाखांहून अधिक सूचना प्राप्त झाल्या. या सर्व सूचना शैक्षणिक धोरणाला आणखी प्रभावी पद्धतीने प्रत्यक्षात लागू करण्यास मदत करतील.
आपल्या देशात प्रत्येक राज्याचे स्वत:चे एक वेगळेपण आहे. प्रत्येक ठिकाणची कोणती ना कोणती पारंपरिक कला, कारागिरी, नवनिर्मिती प्रसिद्ध आहे. विद्यार्थ्यांनी अशाजागी जरूर भेट द्यावी. यामुळे त्यांची जिज्ञासाही वाढेल आणि त्यांच्या माहितीतही भर पडेल.
आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांना 21व्या शतकातील कौशल्यासह समृद्ध बनवायचे आहे. क्रिटिकल थिंकींग, क्रिएटीव्हीटी, कोलॅबोरेशन, क्युरॅसिटी आणि कम्युनिकेशन ही 21व्या शतकातील कौशल्ये आहेत, असेही पंतप्रधान मोदींनी नमूद केले. या संमेलनात शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल हेही उपस्थित होते.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …