सरकारवर टीका करणार्यांना मोदींचे प्रत्युत्तर
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
सध्या देश कोरोना नावाच्या व्हायरससोबत लढत आहे, मात्र भारत प्रत्येक संकटातून बाहेर पडला आहे. आपला इतिहास हेच सांगत आहे. एकीकडे देश कोरोना नावाच्या जागतिक संकटाचा सामना करीत आहे, तर दुसरीकडे सरकार म्हणून आमचे लोकांच्या आरोग्यासोबतच अर्थव्यवस्थेच्या आरोग्याकडेही लक्ष आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेवरून केंद्र सरकारवर टीका करणार्यांना सडेतोड उत्तर दिले. इंडिया ग्लोबल वीक 2020मध्ये गुरुवारी (दि. 9) पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. या वेळी त्यांनी देशवासीयांशी संवाद साधला.
आपला देश जेव्हा एखाद्या संकटातून उभारी घेण्याची गोष्ट करतो याचा अर्थ ही उभारी देशाच्या आरोग्याला आणि त्यासोबत अर्थव्यवस्थेलाही मिळणार आहे. अशक्यही शक्य करून दाखवायचे ही भारतीयांची प्रेरणा आहे. आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला सावरण्याचा ग्रीन सिग्नल भारतीयांकडून मिळू लागला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
सध्याच्या घडीला सगळे जग कोरोनावर लस शोधत आहे. अशात भारतही लस शोधण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. आपल्या कंपन्याही जगभरात लस शोधण्यासाठी मदत करीत आहेत. ज्या देशांमध्ये खुली अर्थव्यवस्था आहे, अशा देशांपैकी भारत एक आहे. आम्ही जगभरातील गुंतवणूकदारांचे भारतात स्वागत करतो. देशातील फार्मा उद्योग हा फक्त भारतासाठीच नाही तर जगासाठी महत्त्वाचा ठरत आहे. आत्मनिर्भर भारत या शब्दावरही मोदींनी पुन्हा एकदा जोर दिला आहे. आत्मनिर्भर या शब्दाचा अर्थ आत्मकेंद्री होणे असा नाही, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वेळी स्पष्ट केले.