Breaking News

दसर्याचे खरे सोने

अत्यंत अभूतपूर्व परिस्थितीमध्ये यंदाचा दसरा उंबरठ्यावर आला आहे. एरव्ही दसरा-दिवाळीचे दिवस आले की बाजारपेठा फुलून गेलेल्या असतात. विविध प्रकारच्या चीजवस्तू, कपडे, दागदागिने, मिठाया यांच्या खरेदीसाठी गर्दी करणार्‍या सर्वसामान्यांनी दुकाने गजबजून गेलेली असतात. शेतकरी असो वा चाकरमानी खिशात थोडाफार पैसा खुळखुळू लागलेला असतो. दसर्‍याच्या शिलंगणासाठी संपूर्ण देशच आतुर झालेला असतो. यंदा मात्र दसर्‍याच्या सीमोल्लंघनाचा अर्थच पालटून गेला आहे.

शिलंगण म्हणजे सीमोल्लंघन. हजारो वर्षांच्या कृषी संस्कृतीतून आलेला हा एक महत्त्वाचा सण आहे. भारतीय परंपरेनुसार साडेतीन शुभमुहुर्तांपैकी एक. यादिवशी शेतकरी आपल्या गोधनाचे लाड करतात तर शहर भागातील चाकरमानी आपट्याची पाने एकमेकांना सोने म्हणून वाटून परस्पर सौहार्द व्यक्त करत असतात. रामायण आणि महाभारत या दोन्ही ग्रंथांमध्ये विजयादशमीचे उल्लेख आहेत. या दिवशी प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध केला असे रामायण सांगते. तर विराटाघरी पाहुणे म्हणून राहिलेल्या पाच पांडवांनी याच दिवशी शमी वृक्षाच्या ढोलीत लपवलेली आपली शस्त्रे बाहेर काढून आपला अज्ञातवास संपल्याचे जाहीर केले, असे महाभारतात म्हटले आहे. अर्थात काळाच्या ओघात विजयादशमीचे संदर्भ बदलले. यंदा तर दसर्‍याच्या सीमोल्लंघनाचा अर्थच पालटून गेला आहे. कोरोना महामारीच्या संकटातून आपला देश अजूनही पुरता बाहेर आलेला नाही. तरीही अर्थव्यवस्था हळूहळू का होईना पूर्वपदावर येऊ लागल्याची लक्षणे आहेत. देशाचे अर्थचक्र इतक्या सहजासहजी वेग घेईल अशी शक्यता नाही. त्यासाठी निकराचे प्रयत्न आवश्यक आहेत व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली त्या दिशेने निश्चित वाटचाल सुरू आहे. महाराष्ट्रात मात्र परिस्थती काहिशी नाजुकच आहे. अर्थचक्राला गती देण्याच्या प्रयत्नांऐवजी राज्य सरकार राजकारणाच्या भानगडीतच अधिक गुंतलेले दिसते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्त आणि अतिवृष्टीग्रस्तांसाठी दहा हजार कोटी रुपयांचे पॅकेज शुक्रवारी जाहीर केले. उद्ध्वस्त फळबागांसाठी हेक्टरी 25 हजार रुपये आणि जिरायती शेतीसाठी हेक्टरी दहा हजार रुपये मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. हा शेतकर्‍यांचा उघडउघड अपमान आहे. कारण जास्तीत जास्त दोन हेक्टरसाठीच ही मदत उपलब्ध होऊ शकते. बाकीच्या सर्व शेतकर्‍यांना सरकारने वार्‍यावर सोडले आहे. हेच उद्धव ठाकरे आठ-दहा महिन्यांपूर्वी हेक्टरी पन्नास हजार रुपयांच्या मदतीची मागणी तत्कालीन राज्य सरकारकडे करत होते. परंतु तेव्हा ते मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत बसलेले नव्हते. आता खुर्ची हस्तगत झाल्यावर सत्ताधार्‍यांची भाषा बदलली असेच म्हटले पाहिजे. पूरग्रस्त व अतिवृष्टीग्रस्तांच्या भेटीसाठी वांद्रे सोडून शेतकर्‍यांच्या बांधावर गेलेल्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काही दुर्दैवी शेतकर्‍यांना अडीच आणि तीन हजार रुपयांचे धनादेश वाटण्यात आले. हा प्रकार चारच दिवसांपूर्वी घडला आहे. त्यावरूनच या दहा हजार रुपयांच्या पॅकेजचे काय होणार याची झलक महाराष्ट्राला बघायला मिळाली आहे. नाकर्ते सरकार आणि प्रतिकूल निसर्ग यांच्या भयंकर कात्रीमध्ये अडकलेल्या महाराष्ट्राला विजयादशमीचे सीमोल्लंघन करावे लागणार आहे. या वेळी दसर्‍याच्या दिवशी एकमेकांना सोने वाटताना नागरिकांनी काटेकोर काळजी घ्यावी किंबहुना शक्यतो सुरक्षित अंतरावरुनच एकमेकांना शुभेच्छा द्याव्यात आणि घ्याव्यात. यंदाच्या दसर्‍याचे शिलंगण किंवा सीमोल्लंघन होता होईतो घरात बसूनच साधावयास हवे. परस्परांची काळजी घेणे हा यंदाच्या विजयादशमीचा सांगावा आहे. हे सौहार्द म्हणजेच दसर्‍याचे सोने आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply