लंडन ः वृत्तसंस्था
ऑस्ट्रेलियाच्या अग्रमानांकित अॅश्ले बार्टी हिने चेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना प्लिस्कोव्हा हिचा संघर्षपूर्ण अंतिम लढतीत पाडाव करीत विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेच्या जेतेपदावर पहिल्यांदाच नाव कोरले. फ्रेंच खुल्या स्पर्धेनंतर (2019) बार्टीचे हे दुसरे ग्रँडस्लॅम जेतेपद ठरले. प्लिस्कोव्हाची कडवी लढत मोडीत काढत बार्टीने 6-3, 6-7 (4/7), 6-3 असा विजय मिळवत जेतेपद पटकावले. मार्गारेट कोर्ट (1963, 1965 आणि 1970), इव्होनी गुलागाँग कावली (1971 आणि 1980) यांच्यानंतर विम्बल्डनचे जेतेपद पटकावणारी बार्टी ही ऑस्ट्रेलियाची तिसरी महिला टेनिसपटू ठरली आहे. बार्टीने पहिल्या सेटमध्ये सुरुवातीलाच दोन वेळा प्लिस्कोव्हाची सर्व्हिस मोडीत काढत 4-0 अशी आघाडी घेतली होती. बार्टीचा खेळ बहरत असताना प्लिस्कोव्हाला गुण मिळवतानाही कठीण जात होते. बार्टी पहिला सेट सहजपणे जिंकणार असे वाटत असतानाच प्लिस्कोव्हाने दोन वेळा सर्व्हिस भेदत प्रतिकार केला. बार्टीने अखेर पहिला सेट 6-3 अशा फरकाने जिंकून सामन्यात आघाडी घेतली. दुसर्या सेटमध्ये दमदार खेळ करीत प्लिस्कोव्हाने सामन्यात पुनरागमन केले. याही वेळी बार्टीने प्लिस्कोव्हाची सर्व्हिस मोडीत काढत 3-1 अशी आघाडी घेतली. पण प्लिस्कोव्हाने तिला चोख प्रत्युत्तर देत सामना 5-5 अशा बरोबरीत आणला. त्यानंतर बार्टीने प्लिस्कोव्हाची आणि मग प्लिस्कोव्हाने बार्टीची सर्व्हिस भेदत दुसरा सेट टायब्रेकरमध्ये नेला. अखेर टायब्रेकरमध्ये प्लिस्कोव्हाने 4-2 अशी आघाडी घेत सामन्यात बरोबरी साधली. तिसर्या आणि निर्णायक सेटमध्ये सुरुवातीलाच प्लिस्कोव्हाची सर्व्हिस भेदत बार्टीने 3-0 अशी आघाडी घेतली. त्यानंतर बार्टीने 4-1 अशी आगेकूच केली होती. प्लिस्कोव्हाने तिला लढत देण्याचा प्रयत्न केला, पण बार्टीने आपल्या सर्व्हिसवर गुण मिळवत तिसर्या सेटसह जेतेपद आपल्या नावावर केले.
कॅरोलिना प्लिस्कोव्हाविरुद्ध खेळताना माझी खरी कसोटी लागली. इव्होनी कावली यांना अभिमान वाटावा, अशी कामगिरी साकारण्याची माझी इच्छा होती. आता जेतेपद मिळवल्याने मी आनंदी आहे.
-अॅश्ले बार्टी