नववर्षाचे अनोखे स्वागत
कर्जत : बातमीदार
महाराष्ट्रातील सर्वांत उंच म्हणून प्रसिद्ध असलेल्या कळसूबाई शिखरावर पोहचून राज्याच्या 20 जिल्ह्यांतील 70 दिव्यांगांनी नववर्षाचे स्वागत अभिनव पद्धतीने केले. यामध्ये कर्जत येथील एका दिव्यांगाचा समावेश होता.
अनेकांनी फक्त शिक्षण घेताना अभ्यासक्रमात वाचलेले कळसूबाई शिखर प्रत्यक्षात चढण्याची मोहीम 31 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती. दुपारी 2 वाजता सर्व जणांनी चढाईला सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव, कळसूबाई माते की जय अशा घोषणा देत दिव्यांगांनी शिखराकडे कूच केली. या मोहिमेत सहभागी असलेले स्त्री व पुरुष दिव्यांग एकमेकांना आधार देत होते. सायंकाळी सर्वांनी कळसूबाई शिखराचा माथा गाठला. शिखरावर असलेल्या कडाक्याच्या थंडीत आणि सोसाट्याच्या वार्यात त्यांनी तंबूमध्ये मुक्काम केला.नववर्षाच्या पहाटेला कळसूबाई मंदिरात तसेच उगवत्या सूर्याचे दर्शन घेऊन नवीन वर्षाचे अनोख्या पद्धतीने स्वागत केले आणि गडावरून परतीचा प्रवास सुरू केला.
या मोहिमेत कर्जत येथील शिक्षण विभागात लिपिक म्हणून कार्यरत असणारे आणि जन्मजात एका पायाने दिव्यांग असलेले 53 वर्षीय गिर्यारोहक जनार्धन पानमंदही सहभागी झाले होते. आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर आजवर त्यांनी महाराष्ट्रातील अनेक गड-किल्ल्यांवर यशस्वीपणे चढाई केली असून, कळसुबाई शिखर सर करण्याची ही त्यांची सातवी वेळ होती. या मोहिमेत त्यांचा सहभाग इतरांनाही प्रेरणादायी ठरला. सर्व सहभागी दिव्यांगांना शिवुर्जा प्रतिष्ठानच्या वतीने कळसुबाई शिखर यशस्वीपणे सर केल्याबद्दल प्रमाणपत्र व पदक देऊन सन्मानित करण्यात आले.