Breaking News

बैलगाडीच्या चाकाची कुरकुर झाली कमी!

माणगाव : सलीम शेख

कधीकाळी ग्रामीण भागात प्रगतीचे चाक फिरविणार्‍या बैलगाडीचे प्रमाण सध्या खूपच कमी झाले असून, आता गावा गावात अवघ्या काही बैलगाड्या उरल्या आहेत. चाकाचा शोध लागला आणि माणसाच्या प्रगतीचे चाक गतिमान झाले. विशेषत: शेती आधारित व्यवसायाला बैलगाडीने गती दिली. अनेक शतके शेतीचा भार सांभाळणारी, प्रवासी व सामानसुमानाची ने-आण करणारी बैलगाडी, यंत्रयुगातील विविध साधनांच्या शोधामुळे कमी महत्वाची झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांवर दिसणारी बैलगाडी आता क्वचित  दिसत आहे. पुर्वी शेतीच्या कामासाठी बैलगाडी हमखास पाहायला मिळायची. भारे वाहून नेणे, लाकूडफाटा वाहने, बैलगाडीत बसून नातेवाईकांकडे जाणे, अगदी रुग्णाला वैद्यकीय उपचारासाठी बैलगाडीचा उपयोग होत होता. त्यामुळेच वाहतुकीच्या साधनांची कमतरता असताना ग्रामीण भागातील बैलगाडी हीच सर्वसामान्यांना आधार होती. बदलत्या काळात विविध प्रकारची वाहने आली, सोयी सुविधा गतिमान झाल्या, शेतीमध्ये ट्रॅक्टर आदी साधनांचा वापर होऊ लागला. त्यामुळे घराघरात दिसणार्‍या बैलजोड्या कमी झाल्या. व ग्रामीण भागातील बैलगाडीच्या चाकांची कुरकुर कमी झाली. ग्रामीण भागात पूर्वी शेतीच्या, घरबांधणीच्या कामात बैलगाडीचा उपयोग होत होता. त्यातून बैलगाडी मालक, चालकांना हमखास रोजगार मिळायचा, त्याकाळी कमाईचे साधन म्हणूनही बैलगाडी उपयोगी होती. अलिकडच्या काळात ग्रामीण भागातील बैलगाडीचे प्रमाण कमी झाले असून, बैलगाडीच्या चाकांची कुरकुर कमी झाली आहे. भविष्यात वस्तुसंग्रहालय, प्रदर्शनात अथवा शेती आधारित पर्यटनातच बैलगाड्या दिसतील की, काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.

पूर्वी शेती आधारित कामासाठी आमच्या घरी बैलगाडी होती. शेतीसाठी बैलजोडी होती. त्यामुळे बैलगाडी विविध कामांसाठी उपयुक्त होती. अलिकडे शेतीची कामे अवजारांच्या साहाय्याने होऊ लागल्याने बैलगाडीचा वापर कमी झाला आहे. त्यामुळे पूर्वी ग्रामीण भागात हमखास दिसणार्‍या बैलगाड्या आता दिसेनाशा झाल्यात.

-दत्ताराम मोंडे, सामाजिक कार्यकर्ते

लहानपणी आम्ही बैलगाडीत बसून नातेवाइकांकडे, नदीवर, शेतावर जात होतो. त्यात एक मजा व आनंद होता. अलीकडे  लहान मुलांना चित्रातून बैलगाडी दाखवावी लागते.

-कल्पेश पोटले, चाकरमानी

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply