पनवेल : रामप्रहर वृत्त
येथील महापालिका प्रशासनाने 18 ते 44 वयोगटातील लसीकरणाबाबत लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता किंबहुना त्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता शनिवारी (दि. 1) अचानक नियोजनशून्यतेने महापालिका हद्दीतील नागरिकांचे लसीकरण केले. यामुळे पुन्हा एकदा महापालिकेच्या भोंगळ कारभाराची नागरिकांना प्रचिती आली, अशा शब्दांत नगरसेविका रूचिता लोंढे यांनी निषेध व्यक्त करीत मनपा आयुक्तांना निवेदन दिले आहे. यापुढील लसीकरणाबाबत सुस्पष्टता असणारे पत्रक काढून नागरिकांना आश्वस्त करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
या निवेदनात नगरसेविका रूचिता लोंढे यांनी म्हटले आहे की, आज 1 मे महाराष्ट्र दिन! कोविड-19च्या संकटाशी लढणार्या महाराष्ट्राला स्वतंत्र होऊन आज 61 वर्षे पूर्ण झाली, परंतु आजही महाराष्ट्रात लोककल्याणकारी योजनांच्या बाबतीत एकवाक्यता निर्माण झाली आहे का, असा प्रश्न पडावा असा भोंगळ प्रकार आज महानगरपालिकेत आढळून आला.
वृत्तवाहिन्यांवरून, महाराष्ट्र शासनामार्फत 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाबाबत गोंधळात टाकणारी विधाने प्रसारित होत असूनही पनवेल महानगरपालिकेवर विश्वास ठेवून महापालिकेच्या हद्दीतील लसीकरण सुनियोजित होण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन प्रशासनाकडे विचारणा करून नागरिकांना योग्य मार्गदर्शन करून आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला, मात्र लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता किंबहुना त्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक नियोजनशून्यतेने पनवेल महापालिका हद्दीतील 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू झाल्याचे बाह्य संपर्कातून समजले आणि पुन्हा एकदा पनवेल महापालिकेच्या भोंगळ कारभाराची नागरिकांना प्रचिती आली. लसीकरणासारखा अत्यंत गंभीर विषय इतक्या बेजबाबदारपणे हाताळला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू होणार असल्याची कोणतीही पूर्वकल्पना न देता केवळ उद्घाटनाचा अट्टाहास धरून लसीकरणासारख्या गंभीर विषयाकडे निष्काळजीपणे बघितले जात आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून नागरिकांचा महापालिकेवरील व पर्यायाने आपल्या कार्यपद्धतीवरील विश्वास ढळत आहे.
पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी नेहमीच पक्षीय राजकारण बाजूला ठेवून नागरिकांच्या कल्याणकारी योजनांसाठी पनवेल महापालिकेला सर्वतोपरी सहकार्य केले आहे. अनेक शासकीय योजना, उपक्रमांना पनवेलचे पालक या नात्याने मदत केली आहे. त्यांच्या जबाबदारीपूर्ण कार्यामुळे त्यांनी नगरसेवकांनाही हीच कार्यप्रेरणा दिली आहे, मात्र 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाबाबत महापालिकेने केलेली आततायी कृती ही संपूर्ण लसीकरण प्रक्रियेतील विश्वासार्हता व त्याची गती कमी करण्यास कारणीभूत ठरेल, अशी भीती निर्माण करीत आहे.
ज्येष्ठ नागरिकांचे तसेच 45 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण अशी दुहेरी आव्हाने पेलण्यासाठी महापालिकेला लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी सहकार्य केले आहे. याकामी सुसूत्रता आणण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत, मात्र आजच्या घटनेमुळे आपल्या लसीकरणाबाबतच्या गांभीर्यावर लोकप्रतिनिधींच्या मनात प्रश्न निर्माण होत आहेत.
उद्या दि. 2 मेपासून पनवेल महापालिका क्षेत्रात ज्येष्ठ नागरिकांचे तसेच 45 वयोगटावरील नागरिकांचे लसीकरण होणार आहे किंवा नाही हे स्पष्ट करावे. होणार असल्यास सरकारी की खासगी रुग्णालयात याबाबत स्पष्ट सूचना नागरिकांना मिळणे आवश्यक आहे. त्या लसीकरणाचा प्राधान्यक्रम स्पष्ट होणे आवश्यक आहे, तसेच 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण उद्यापासून अखंड सातत्याने सुरू राहणार आहे का? की आज हा उद्घाटनापुरताच महापालिकेचा खटाटोप होता, याबाबत खुलासा करण्यात यावा. कोविड-19च्या संकटात या महारोगाशी लढण्यासाठी नागरिकांचे सुरक्षाकवच म्हणून सिद्ध होणारे लसीकरण म्हणजे एका नव्या सुरक्षित आयुष्याची आशा आहे. त्या लसीकरणात असा निष्काळजीपणा योग्य नसल्याचे आपल्या निदर्शनास आणून देत आहोत. केवळ आरंभशूरता न दाखवता लसीकरणातील सातत्य ठेवावे. लसीकरण हे आपली प्राथमिकता मानावी. उद्यापासून होणार्या लसीकरणाबाबत अधिक स्पष्टता सांगणारे पत्रक काढून पनवेलच्या नागरिकांना आश्वस्त करावे व यापुढे लसीकरणाकडे एक मोहीम म्हणून न पाहता ते आपले आद्यकर्तव्य मानावे. आपल्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल असा विश्वास वाटतो, असेही नगरसेविका रूचिता लोंढे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. या निवेदनाची प्रत माहितीस्तव आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर यांना पाठविण्यात आलेली आहे.