Breaking News

कोरोना महामारी आणि मानवी जीवन

मानवी जीवन किती अनमोल अन् क्षणभंगूर आहे या दोन्हीचा प्रत्यय सध्या एकाच वेळी येतोय. वैश्विक महामारी कोरोनाचे थैमान सलग दुसर्‍या वर्षी सुरूच आहे, किंबहुना दुसर्‍या लाटेत धोका अधिक वाढल्याचे दिसून येते. कोविड-19 विषाणूमुळे लोक अक्षरश: किड्या-मुंगीप्रमाणे मरताहेत. परिणामी सर्वत्र भीतीयुक्त आणि नैराश्यपूर्ण वातावरण पहावयास मिळत आहे. असे म्हणतात की कितीही काहीही केले तरी माणसाला त्याची जीवन-मरणाची लढाई स्वत:च लढावी लागते. कोरोना काळात त्याचा सातत्याने अनुभव येत आहेत.

चीनमध्ये उत्पत्ती झालेल्या कोरोना नामक महामारीने गेल्या वर्षी हळूहळू करून संपूर्ण जग व्यापले. विशेषकरून अमेरिका, इंग्लंड, रशिया यांसारख्या बड्या राष्ट्रांना त्याचा फटका जास्त बसला. त्या तुलनेत आपल्या भारतात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव होऊनही परिस्थिती हाताबाहेर गेली नव्हती. लॉकडाऊनच्या सहा महिन्यानंतर तर रुग्णसंख्या हळूहळू घटत जाऊन नव्या वर्षाच्या प्रारंभी सर्वकाही सुरळीत झाले. त्यामुळे आता कोरोना देशातून जणू हद्दपार झाला असे चित्र दिसू लागले होते, मात्र गतवर्षीप्रमाणे यंदाही मार्च महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आणि आतापर्यंत तर कोरोनाचे जागतिक जवळपास सर्व उच्चांक आपण मोडित काढले आहेत. मृतांची आकडेवारीही दिवसागणिक वाढत चालल्याने चिंता व्यक्त होत आहे.

इंग्रजीत एक म्हण आहे ‘हेल्थ इज वेल्थ.’ याचा अर्थ आरोग्य हीच संपत्ती! खरंच आरोग्य आणि पर्यायाने आयुष्य किती मौल्यवान असते याची जाणीव एव्हाना सर्वांना झाली आहे. एरवी स्वच्छतेसह आरोग्याकडे कळत-नकळतपणे दुर्लक्ष करणारी मंडळी आता मात्र सर्व नियमांचे घाबरून का होईना पण पालन करीत आहेत. यापूर्वी जेव्हा रुग्णसंख्या घटत होती तेव्हा अनेक जण तोंडाला मास्क बांधत नव्हते. सामाजिक अंतराचा तर पूर्णत: फज्जा उडाला होता, पण जेव्हा परिस्थिती बिकट बनू लागली आणि वाढत्या रुग्णांना वैद्यकीय सुविधा अपुर्‍या पडू लागल्या, दुर्घटना घडू लागल्या तेव्हा मात्र लोक भानावर आले. तोवर वेळ निघून गेली होती. आपल्या महाराष्ट्रात तर स्थिती गंभीर आहे. देशातील रुग्ण आणि मृतांच्या संख्येत राज्य अव्वल आहे. राज्य शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन उपाययोजना करणे गरजेचे आहे, शिवाय स्वत:सह कुटुंबांच्या सुखरूपतेसाठी जनतेनेही काळजी घेतली पाहिजे.

सरते वर्ष कोरोना प्रादुर्भावात गेले. नव्या वर्षात तर संसर्ग कैक पटींनी वाढला आहे. अशात दिलासादायक बाब म्हणजे यंदा कोरोनावरील लसी सर्वत्र उपलब्ध झालेल्या आहेत. भारतात कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लसींचे डोस नागरिकांना दिले जात आहेत. जागतिक पातळीवर सर्वाधिक प्रभावशाली ठरलेली रशियाची स्पुटनिक-व्ही लसही आपल्या देशात दाखल झाली आहे. ऑक्सिजन, रेमडेसिवीर यांचा पुरवठाही होऊ लागला आहे. अर्थात, देशातील एवढी मोठी लोकसंख्या पाहता वैद्यकीय सुविधा सर्वांना तातडीने मिळणार नाहीत, परंतु एकेक पाऊल पुढे पडत आहे.

कोरोना संकटकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नाने भारताच्या मदतीला अनेक देश सरसावले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनेही (डब्ल्यूएचओ) वैद्यकीय उपकरणे आणि मनुष्यबळ यांची कुमक पाठविली आहे. सरकारच्या मदतीला देशातूनही काही हात पुढे सरसावले आहेत. टाटा उद्योगसमुहाचे सर्वेसर्वा रतन टाटा, रिलायन्स कंपनीचे मुकेश अंबानी यांनी ऑक्सिजन पुरवठा सुरू केला आहे. काही क्रिकेटपटू आणि संघांनी आर्थिक मदत देऊ केली आहे. अशा या संकटसमयी देशातील सेलिब्रिटींनीही सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सहकार्य केले पाहिजे. 

कोरोना जीवघेणा ठरत असला तरी यातून बरे होणार्‍यांची संख्याही वाढत आहे. विशेष म्हणजे काही वयोवृद्ध कोरोनावर यशस्वीपणे मात करताना दिसत आहेत. त्यामुळे या काळात सर्वांत आवश्यक गोष्ट म्हणजे सकारात्मक राहायला हवे. संसर्गजन्य कोरोनाचे नवनवे घातक स्टेन निर्माण होत असल्याने त्याची तीव्रता अधिक आहे, पण आधीही वेळोवेळी असे साथरोग, असाध्य आजार मानवाला गिळंकृत करू पाहत होते. त्या वेळी तर आताइतके प्रगत तंत्रज्ञान, सोयीसुविधा नव्हत्या. तरीही त्याच्यावर मात करून जग उभे राहिले. कोरोनारूपी महासंकटाचाही सर्वांनी धैर्याने अन् खंबीरपणे सामना करायचा आहे.

खरेतर पूर्वीची जीवनशैली आदर्शवत होती. तेव्हा लोक आहार-विहाराबाबत सजग असत. सकाळचा व्यायाम आणि रात्रीची शतपावली चुकवली जात नसे. सात्विक व शुद्ध अन्नग्रहण केले जाई. मुख्य म्हणजे घरातील सदस्य एकत्र बसून संवाद साधत. एकमेकांची सुख-दु:खे वाटून घेत असत. एवढेच नव्हे तर इतरांबद्दलही आत्मियता होती. नव्या जमान्यात सारे काही बदलले. माणूस भौतिक सुखात गुरफटला. त्यामुळे त्याचा संपर्क-संवाद तुटला, हालचाल मंदावली. परिणामी तो एकटा पडला आणि आता कोरोना महामारीत तर तो पुरता हतबल झालाय. यातून बाहेर पडायचे असेल तर पहिल्यांदा जीवन जगण्याची पद्धती बदलायला हवी. तंदुरुस्त राहण्यासाठी व्यायाम अनिवार्य आहे. अगदी घरच्या घरी योगसाधनाही करता येऊ शकते. मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी सोशल मीडियाचा अतिरेक टाळून घरच्यांशी संवाद साधणे केव्हाही चांगले.

दुर्दैवाने इलेक्ट्रॉनिक मीडियातही भय निर्माण होईल अशा बातम्यांचा भडिमार होत असल्याने त्याचा विपरित परिणाम मानसिकतेवर होत आहे. जगात कुठे काय चाललेय हे माहीत होण्यासाठी अपडेट राहणे आवश्यक असले तरी सातत्याने त्यात गुंतून पडणे अयोग्य आहे. येत्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे त्याला हलक्यात घेणे घातक ठरेल. अशा वेळी नियमांचे पालन करून तसेच सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जीवन जगणे केवळ आपल्या हातात आहे आणि तेच सध्या आवश्यक आहे. 

-समाधान पाटील, अधोरेखित

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply