उरण : वार्ताहर : केवळ शिवजयंतीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने घोषणा देऊन त्यांचे विचार समाजात रुजणार नाहीत तर स्वतःमध्येच छत्रपती शिवाजी महाराजांना पाहावे लागेल, त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करावे लागतील असे मत अहमदनगर येथील अॅड. नागेश जायभाय यांनी व्यक्त केले, ते रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात आयोजित केलेल्या शिवजयंती कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोरख सांगळे उपस्थित होते.
अॅड. नागेश जायभाय यांनी रयतेच्या राजाचा विजयी आणि प्रेरणादायी इतिहास आवेशपूर्ण भाषेतून उपस्थित विद्यार्थ्यांना सांगितला. तसेच छत्रपतीचे चरित्र, चारित्र्य आणि पराक्रम अखंड देशाला आणि समाजाला प्रेरणा देणारा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचे सुराज्यात रूपांतर करावयाचे असेल तर समग्र जनतेने त्यांची विचार आचरणात आणले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. गोरख सांगळे म्हणाले की, देशाच्या इतिहासात अनेक राजे होऊन गेले परंतु ते कुणाच्याच लक्षात राहिले नाहीत मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम शतकोनुशतके इथल्या माणसाच्या मनामनात, नसानसात घर करून आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम न विसरता येणारा, न पुसणारा आहे. तेव्हा विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजाचे वेगवेगळे गुण शोधून ते आपल्या अंगी बाणवण्याचा प्रयत्न करावा. तरच शिवजयंती खर्या अर्थाने साजरी झाली असे म्हणता येईल.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. रमेश म्हात्रे यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. ए. यु. सरवदे यांनी तर आभार प्रा. यु. टी. घोरपडे यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.