मुरुड : प्रतिनिधी
तालुक्यांतील शिघ्रे ग्रामपंचायतीची कचरा गोळा करणारी घंटागाडी गेल्या पाच महिन्यांपासून बंद करण्यात आल्याने गावाच्या वेशीवरील गटारात मोठया प्रमाणावर कचरा टाकण्यात येत आहे. त्यामुळे मुख्य रस्त्याला उकिरड्याचे स्वरूप आले असून, ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. या कचर्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यासाठी प्रशासनाने तातडीने शिघ्रे ग्रामपंचायतीला डम्पिंगग्राऊंडची जागा निश्चित करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. शिघ्रे ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील शिघ्रे, वाणदे, नागशेत, नवीवाडी व आदिवासीवाडी या भागातील कचरा घंटागाडीद्वारे गोळा केला जात असे. मात्र गेल्या पाच महिन्यांपासून ग्रामपंचायतीची घंटागाडी बंद आहे. गावाच्या मुख्य रस्त्यावर सध्या प्रवेशद्वार उभारणीचे काम प्रगतीपथावर त्याच्यासमोरच कचरा टाकला जात आहे. त्याचा येणार्या-जाणार्यांना त्रास होत आहे. या संदर्भात सरपंच संतोष पाटील यांनी सांगितले की, ग्रामपंचायतीने 14 व्या वित्त आयोग निधीतून डिसेंबर 2020 मध्ये घंटागाडी घेतली होती. त्याद्वारे गावातील कचरा गोळा करून त्याची ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागेत विल्हेवाट लावण्यात येत होती. मात्र ही जागा मुख्य रस्त्यालगत असल्याने त्याचा त्रास ग्रामस्थांना होऊ लागला. त्यामुळे घंटागाडी बंद करण्यात आली. घंटागाडी सुरू करणे आणि कचर्याची योग्य पद्दतीने विल्हेवाट लावण्यासाठी डम्पिंगग्राऊंडची जागा निश्चित होणे, गरजेचे झाले आहे. त्यासाठी महसूल व वन विभागाने तातडीने स्थळ पहाणी करावी आणि डंपिंग ग्राऊंडसाठी जागा निश्चित करून ती शिघ्रे ग्रामपंचायतीला हस्तांतरीत करावी, अशी मागणी शिघ्रे ग्रामस्थांनी केली आहे.
ग्रामपंचायत हद्दीतील गट नंबर 37, 33 व 43 या जागा सरकारी मालकीची असून सदर जागा डम्पिंगग्राऊंडकरीता उपलब्ध होण्यासाठी जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा सुरू आहे.
– संतोष पाटील, सरपंच, ग्रुपग्रामपंचायत शिघे्र