Breaking News

बेलपाडा गावासाठी नवीन जलकुंभाची उभारणी करा!

सभागृहनेते परेश ठाकूर यांची आयुक्तांकडे मागणी

पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिका हद्दीतील खारघर येथील भूखंड क्रमांक 119वरील सिडको नियोजित बाजार क्षेत्र ठिकाणी बेलपाडा गावासाठी नवीन जलकुंभाची उभारणी करावी, अशी मागणी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
खारघर येथील भूखंड क्रमांक 119वरील सिडको नियोजित बाजार क्षेत्र या ठिकाणी बेलपाडा गावासाठी नवीन जलकुंभाची उभारणी करण्यासाठी भाजपचे नगरसेवक शत्रुघ्न काकडे यांनी सभागृह नेते परेश ठाकूर यांना मागणीचे निवेदन दिले होते. त्या अनुषंगाने सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांना निवेदन देऊन मागणी केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, पनवेल महापालिका हद्दीतील खारघर परिसरात लोकसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे या भागास पाणीपुरवठा करण्याबाबत अनेक अडचणी येत आहेत. बेलपाडा गावातील नागरिकांना दैनंदिन पाण्यावाचून नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या ठिकाणी पाण्याचा पुरेसा असा दुसरा कोणताही स्रोत उपलब्ध नाही. त्यामुळे नागरिकांना पाणी वेळेवर व मुबलकपणे मिळत नसल्याने त्यांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे.
बेलपाडा गाव हे महापालिकेत समाविष्ट झाल्याने मनपाकडून या समस्येवर कायमस्वरुपी प्रभावी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने या भागात एक जलकुंभाची उभारणी केल्यास या ठिकाणी पाण्याची मोठ्या प्रमाणावर साठवणूक करता येईल व नागरिकांना वेळेत व मुबलक पाणी उपलब्ध होईल. त्याकरिता जलकुंभाची उभारणी करणे अत्यंत आवश्यक आहे. ते लक्षात घेता महापालिकेमार्फत तातडीने जलकुंभाची उभारणी करण्याबाबत उपाययोजना करण्याचे आदेश संबंधित विभागास देण्यात यावेत.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply