- भाजप नेते किरीट सोमय्या यांची मागणी
- उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा
अलिबाग ः प्रतिनिधी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबीयांनी मुरूडमधील कोर्लई येथे खरेदी केलेल्या जमिनीच्या खरेदी प्रकरणाची विशेष तपास यंत्रणेमार्फत (एसआयटी) चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे. या संदर्भात रेवदंडा पोलिसांनी पुढील सात दिवसांत एफआयआर नोंदवला नाही तर आपण उच्च न्यायालयात जाणार असल्याचेही त्यांनी सोमवारी (दि. 3) स्पष्ट केले
कोर्लई येथील जमीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर यांच्या नावे खरेदी करण्यात आली आहे. या जमिनींच्या दस्तऐवजात छेडछाड, वनकायद्याचा भंग, अतिक्रमण, अस्तित्वात नसलेल्या घरांना असेसमेंट उतारे देणे असे गैरप्रकार झाल्याचा किरीट सोमय्या यांचा आरोप आहे. मागील काही महिन्यांपासून या प्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी ते सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. दोन महिन्यांपूर्वी कोर्लई ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन त्यांनी कागदपत्रांची पडताळणी केली. त्यानंतर मार्च महिन्यात रेवदंडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रारही दाखल केली आहे.
रेवदंडा पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीचा पाठपुरावा करण्यासाठी सोमय्या यांनी सोमवारी रेवदंडा पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकारी अशोक थोरात यांची भेट घेतली. या प्रकरणात रेवदंडा पोलिसांकडून समाधानकारक उत्तर मिळत नाही. 14 दिवसांत एफआयआर दाखल होणे अपेक्षित असताना दोन महिने झाले तरी पोलिसांनी अद्याप एफआयआर दाखल केला नसल्याचे सोमय्या यांनी सांगितले. (पान 2 वर..)
आता आपल्याकडे उच्च न्यायालयात जाण्यावाचून पर्याय नाही. पुढील सात दिवसांत जर एफआयर दाखल झाला नाही तर आपण न्यायालयात दाद मागू, असे सोमय्या यांनी सांगितले, तसेच हे प्रकरण अतिशय गंभीर असून, त्याची एसआयटी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. या वेळी त्यांच्यासमवेत भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अॅड. महेश मोहिते उपस्थित होते.
तटकरे, गोगावलेंना वसुलीतच रस
पॉस्को कंपनीच्या भंगारावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये झालेल्या राड्यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी तिखट शब्दांत प्रतिक्रिया दिली. शिवसेना, राष्ट्रवादी आपापल्या पद्धतीने खंडणी वसूल करीत आहेत. सचिन वाझे प्रकरणातून राज्यात जे खंडणी प्रकरण समोर आले त्यातलाच हा प्रकार आहे. पॉस्को कंपनीतील कंत्राटावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत जे सुरू आहे ते गंभीर आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. रुग्ण दगावताहेत. रुग्णालयांत जागा नाही. अशा वेळी खासदार सुनील तटकरे आणि आमदार भरत गोगावले यांना कंत्राटे व वसुलीतच रस असल्याची टीका सोमय्यांनी केली.
पंढरपूरमधील नाचक्कीचे उत्तर द्या
राज्यातील पंढरपूर पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीचा पराभव झाला तरी बंगालमध्ये ममतांची सत्ता पुन्हा आली म्हणून हुरळून गेले आहेत. खरेतर शिवसेना, राष्ट्रवादीवाले हे त्यांचा साथीदार असलेला पक्ष काँग्रेसचा पराभव झाल्याने त्याचा आनंद व्यक्त करीत आहेत. काँग्रेस तेथे शून्यावर आली आहे आणि भाजप तीनवरून 76वर पोहचला. आपला पराभव झाकून ठेवण्यात ते माहीर आहेत. पंढरपूरमध्ये तुमच्या सरकारची नाचक्की का झाली याचे उत्तर द्या, असे आव्हानही सोमय्या यांनी या वेळी दिले.