अलिबाग ः प्रतिनिधी
तौक्ते चक्रीवादळाच्या दणक्याने रायगडात फळबाग, शेती व घरांचे मोठे नुकसान झाले आहे. या लोकांना आवश्यक ते सामान खरेदी करता यावे यासाठी जीवनावश्यक वस्तूंची व हार्डवेअर दुकाने पूर्ण वेळ सुरू ठेवण्यास रायगड जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे.
राज्यातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपत्कालीन उपाययोजना म्हणून नव्याने लागू केलेल्या निर्बंधांच्या अनुषंगाने महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाकडील अधिसूचनेद्वारे सर्व किराणा, भाजीची दुकाने, फळ विक्रेते, दूध डेअरी, बेकरी, मिठाई, खाद्यपदार्थ दुकाने (चिकन, मटण, पोल्ट्री, मच्छी व अंडी त्यात समावेश), कृषी अवजारे व शेतातील उत्पादनांशी संबंधित दुकाने, पाळीव प्राण्यांच्या खाद्यपदार्थांची दुकाने, व्यक्तींसाठी तसेच आस्थापनांसाठी पावसाळ्यापूर्वी करण्यात येणार्या कामाकरिता लागणार्या साधनसामुग्री संबंधित दुकाने फक्त सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत सुरू राहतील, असे आदेश पूर्वी पारित करण्यात आले होते.
जिल्ह्यात आलेल्या चक्रीवादळामुळे घरे, वाडे, गोठ्यांचे मोठ्या प्रमाणात झालेले नुकसान व त्या अनुषंगाने उद्भवलेली आपत्तीजन्य स्थिती विचारात घेता व नागरिकांना त्यांच्या नुकसानग्रस्त वास्तूंची तत्काळ दुरुस्ती करणे आवश्यक असल्याने त्या दृष्टीने जिल्ह्यात निर्बंधित केलेल्या आस्थापना, दुकानांपैकी किराणा, भाजीची दुकाने, फळ विक्रेते, चिकन- मटण, मासळी विक्रेते, रास्त भाव धान्य दुकाने, फॅब्रिकेशन कामे करणार्या आस्थापना, दूध डेअरी, अवजारे व शेतातील उत्पादनांशी संबंधित दुकाने, पावसाळ्यापूर्वी करण्यात येणार्या कामाकरिता लागणारे सिमेंट, पत्रे, ताडपत्री, विद्युत उपकरणे, हार्डवेअर सामान विक्री करणारी दुकाने पूर्ण वेळ सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
मजुरांच्या साह्याने दुरुस्तीची कामे करण्यासाठी कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अधीनतेने जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी परवानगी दिली आहे.
Check Also
पनवेलमध्ये महायुतीकडून जोमाने प्रचार
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलला विकासाच्या दिशेने नेणारे कर्तृत्वत्वान आमदार प्रशांत ठाकूर चौथ्यांदा या विधानसभा …