नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (दि. 20) कोरोनासंदर्भात देशातील वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या 54 जिल्हाधिकार्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे हेही उपस्थित होते. कोरोनाची साथ गेल्या 100 वर्षांतील सर्वांत मोठे संकट आहे. कोरोनाने आव्हाने आणखी वाढवलीत. तुम्ही जिल्ह्यातील सर्वांत मोठे योद्धे आहात. आपल्याला गावागावांत कोरोनामुक्तीचा संदेश द्यायचा आहे. यासाठी व्यापक जनजागृती गरजेची असल्याचे मोदी यांनी या वेळी स्पष्ट केले.
देशात लसीकरण मोहीम सुरू असली तरी मोठ्या प्रमाणावर लस वाया जात आहे. त्याबद्दल चिंता व्यक्त करताना मोदी म्हणाले की, काही ठिकाणी कोरोना लस वाया जात असून ते थांबवायला हवे. एक लस वाया जाणे म्हणजे एका व्यक्तीला ती मिळणार नाही. यामुळे आपण जीवन सुरक्षा कवच देऊ शकणार नाही. म्हणूनच कोरोना लस वाया जाण्यापासून रोखायला हवे.
लहान मुले आणि तरुणांना कोरोनाचा धोका असून त्याबाबत बोलाताना मोदींनी म्हटले की, व्हायरसच्या म्युटेशनमुळे तरुण व मुलांसाठी चिंता व्यक्त केली जात आहे. माझी सर्वांना विनंती आहे की तुम्ही तुमच्या जिल्ह्यात तरुण व मुलांमध्ये संसर्गाची आकडेवारी एकत्र करून त्याची समीक्षा करा.
लोकांचे जीव वाचविण्यासह त्यांचे जीवन नॉर्मल करण्यालाही आपले प्राधान्य आहे. गरिबांसाठी मोफत धान्याची सुविधा असेल किंवा आवश्यक पुरवठा असेल. काळाबाजार रोखण्याचेही मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. या सगळ्यात कोरोनाविरोधातील लढा आपणास जिंकून पुढे जाणेही गरजेचे असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
Check Also
सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …