Breaking News

श्रीलंकेचा क्रिकेटपटू कोरोना पॉझिटिव्ह; भारताविरुद्ध मालिकेच्या वेळापत्रकात पुन्हा बदल

कोलंबो ः वृत्तसंस्था

भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी श्रीलंका संघामधील अडचणी वाढत चालल्या आहेत. सपोर्ट स्टाफच्या दोन सदस्यांना कोरोना संसर्ग झाल्यानंतर आता श्रीलंकेच्या खेळाडूलाही करोनाने ग्रासले आहे. या संकटामुळे भारत-श्रीलंका मालिकेचे वेळापत्रक बदलावे लागले आहे. ‘न्यूजवायर’च्या वृत्तानुसार श्रीलंकेचा फलंदाज संदुन वीरक्ककोडीला करोना झाला आहे. संदुन हा श्रीलंकेच्या दांबुला येथे असलेल्या शिबिरात सराव करीत होता. श्रीलंकेचा दुसरा संघ या सराव शिबिरात थांबला आहे.  इंग्लंडहून परतलेल्या श्रीलंकेच्या खेळाडूंना भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत मैदानात उतरवले जाऊ शकत नाही. अशा परिस्थितीत श्रीलंका क्रिकेट बोर्डाने दांबुलामध्ये खेळाडूंचा एक नवीन संघ तयार केला होता, परंतु आता दांबुला येथे प्रशिक्षण घेत असलेल्या संदुनला कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, श्रीलंकेच्या संघात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) श्रीलंकेच्या बोर्डाकडे संघाचे हॉटेल बदलण्याची मागणी केली होती. बीसीसीआयची मागणी मान्य करीत श्रीलंका बोर्डाने आपल्या खेळाडूंना हॉटेल समुद्रामधून ग्रँड सिनामन हॉटेलमध्ये हलवले आहे.

नवीन वेळापत्रक : बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी भारत आणि श्रीलंका मालिकेचे नवीन वेळापत्रक समोर आणले आहे. एकदिवसीय मालिकेचा पहिला सामना आता 17 ऐवजी 18 जुलै रोजी होणार आहे. दुसरा सामना 20 जुलै आणि तिसरा 23 जुलै रोजी खेळला जाईल, तर टी-20 मालिकेचा पहिला सामना 25 जुलै, दुसरा 27 जुलै आणि तिसरा 29 जुलैला खेळला जाणार आहे.

Check Also

‘नैना’साठी शेतकर्‍यांच्या घरांवर कोणतीही तोडक कारवाई करू नका

आमदार महेश बालदी यांची हिवाळी अधिवेशनात मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तिसर्‍या मुंबईच्या अनुषंगाने नैना …

Leave a Reply