नगरसेविका नेत्रा पाटील यांचा पाठपुरावा
पनवेल : रामप्रहर वृत्त
खारघरच्या विश्वज्योत शाळेसमोर गतिरोधक टाकण्यात आला होता, परंतु या ठिकाणी सिडकोचे अधिकारी व कॉन्ट्रॅक्टरच्या बेजबाबदारपणामुळे पांढरे पट्टे न मारल्यामुळे अनेक तरुणांचे या गतिरोधकारवर अपघात झाले. यामुळे नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी या गतिरोधकावर पांढरे पट्टे मारून घेतले.
सेक्टर 20 येथे विश्वज्योत शाळेच्यासमोर सिडकोच्या माध्यमातून 15 जुलै रोजी गतिरोधक टाकण्यात आला, परंतु बेजबाबदार कामामुळे त्याचरात्री या ठिकाणी चार ते पाच मोटरसायकलस्वारांचा अपघात झाला. त्यात चार तरुण गंभीर जखमी झाले. घडलेल्या अपघाताची माहिती त्वरित सिडकोचे कार्यकारी अभियंता (खारघर-1) व सहाय्यक कार्यकारी अभियंता सिडको या दोन्ही अधिकार्यांना नगरसेविका नेत्रा पाटील यांनी दिली. तसेच त्यांनी खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शत्रुघ्न माळी यांची भेट घेत लेखी निवेदन दिले. यामध्ये त्यांनी सिडकोच्या माध्यमातून टाकण्यात आलेला गतिरोधक हा अपघातांना आमंत्रण देत आहे व या अपघातांना सिडको प्रशासनाचे अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर जबाबदार असल्याचे निदर्शनास आणून देत संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली.
22 जुलै रोजी सकाळी असाच एक तरुण दुचाकीवरून कामाच्या ठिकाणी जात असताना त्याला हा गतिरोधक लक्षात न आल्यामुळे अपघात झाला. या अपघातात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला तत्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याने वेळीच उपचार मिळाले.
या ठिकाणी संबंधित कॉन्ट्रॅक्टरने गतिरोधक बनवल्यानंतर त्यावर पांढरे पट्टे मारणे अत्यंत महत्त्वाचे होते. जेणेकरून वाहन चालकांना ते दिसतील व त्यांच्या वाहनाचा वेग कमी होईल, परंतु या ठिकाणी पांढरे पट्टे मारले नाहीत व त्या त्याठिकाणी कुठलाही फलक लावला नसल्यामुळे वाहनचालकांना गतिरोधक दिसत नसल्याने विशेषतः दुचाकीस्वारांना आपल्या गाडीचा वेग अचानक कमी करणे शक्य होत नसल्याने अनेक अपघात होत होते.