Breaking News

कोरोना रुग्णांच्या आकड्याची लपवाछपवी

खालापुरात शासकीय अहवालाहून प्रत्यक्ष रुग्णसंख्या अधिक

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना अनेक संशयास्पद गोष्टी घडत आहेत. खालापूर तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या प्रत्यक्षात जास्त असूनही प्रशासनाकडून देण्यात येणारी आकडेवारी कमी दाखवली जात असल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.
खालापूर तालुक्यात कोरोना रुग्णांचा आकडा चौदाशेकडे वाटचाल करीत आहे, तर 47 जणांचा बळी गेला आहे. तालुक्यात ग्रामीण भाग, खालापूर नगरपंचायत आणि खोपोली नगर परिषद अशा तीन वेगवेगळ्या नोंदी प्रशासन दररोज प्रसिद्ध करीत असते. खालापूर तालुक्यात 1369 बाधितांची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये खोपोली हद्दीत 560 रुग्ण 14 ऑगस्टपर्यंत दाखविण्यात आले असून, 27 मृत्यू झाले आहेत. चौक मंडल विभागात रुग्णसंख्या 493 असून, 17 मयत आहेत. ही आकडेवारी वगळता खालापूर नगरपंचायत हद्दीत प्रत्यक्षात बाधित जास्त असताना दररोजच्या अहवालात मात्र नोंद कमी येत
असल्याचे निदर्शनास आले आहे. खालापूर शहरातही बाधितांचा आकडा जास्त असताना नोंद कमी दाखवली जात असल्याने संशयास जागा निर्माण झाली आहे. आकड्यांच्या लपवाछपवीमुळे कोरोना रुग्ण वाढण्याची भीती व्यक्त आहे.

तालुका वैद्यकीय अधिकार्‍यांना विचारणा करून प्रत्यक्ष रुग्ण आणि आकडेवारीत तफावत आहे का हे तपासण्यात येईल.
-इरेश चप्पलवार, तहसीलदार, खालापूर

खालापूर नगरपंचायत हद्दीतील कोरोना बाधितांची आकडेवारी तत्काळ संबधित यंत्रणेकडे दिली जाते. याशिवाय रुग्ण सापडल्यास सॅनिटायझर व इतर काळजी घेतली जाते. आधार कार्डवरील पत्त्यामुळे अनेकदा फरक होतो.
-सुरेखा भणगे, मुख्याधिकारी, खालापूर नगरपंचायत

खालापूर शहरात कोरोना रुग्ण आढळल्याची माहिती स्थानिक नागरिकांना मिळते. त्यानंतर योग्य तो क्वारटांइन कालावधी तसेच परिसरात खबरदारी घेणे आवश्यक आहे, मात्र तसे होत नसल्याने रुग्ण वाढत आहेत.
-नितीन पाटील, नागरिक, खालापूर

Check Also

संकट काळात ठाकूर कुटुंबियांनी केलेली मदत जनता विसरणार नाही -जरीना शेख

पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या संकट काळात लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांतदादा ठाकूर, परेशदादा ठाकूर …

Leave a Reply